सावळी (ता. बिलोली) l येथील शालेय पोषण आहार कामगार तसेच बिलोली तालुका अध्यक्ष पिराजी लच्छमन्ना कारकून (वय ५६) यांचे अर्धांगवायूच्या आजाराने दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गावात, परिसरात आणि सर्व परिचितांमध्ये खोल शोककळा पसरली आहे.


सुस्वभावी, साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. सावळी गावातील प्रतिष्ठित आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. गावातील कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा शैक्षणिक उपक्रम त्यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसे. प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येणे हा त्यांचा सहजस्वभाव असल्याने त्यांच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.


गावातील भजनी मंडळाचे ते एक प्रमुख सदस्य म्हणून त्यांनी भजन-कीर्तन परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. माणुसकी, आपुलकी, नम्रता आणि समाजकार्यासाठीची निष्ठा यामुळे ते सर्वांच्या विश्वासाचे आधारस्थान बनले होते. तसेच स्वयंपाकी म्हणून त्यांनी अनेकांच्या मनात वेगळा ठसा उमटवला होता.


शिक्षक बांधवांच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे. प्रामाणिक कार्यशैली, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ, कार्यतत्पर आणि सर्वांना जोडून ठेवणारी व्यक्ती हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

दुपारी २ वाजता सावळी (ता. बिलोली) येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार असून संपूर्ण गाव व परिसर शोकसागरात बुडाला आहे.


