अर्धापूर| अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, युवा पत्रकार गंगाधर सोनटक्के, नॅशनल भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया यांना क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला असून येत्या बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी नागपूर येथे या पुरस्कारांचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.


क्रांतीकारी संत कबीर वाचनालय समिती कामठी जि. नागपूरच्या वतीने संत कबीर यांच्या ६२७ व्या जयंतीनिमित्त ११ जून २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता संत कबीर वाचनालय कामठी नागपूर येथे राष्ट्रीय मेगा फेस्टिव्हल २०२५ चे आयोजन करण्यात आले असून त्यात नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक वक्ते सामाजिक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोणी ता. अर्धापूर जि. नांदेड येथील धडाडीचे युवा पत्रकार गंगाधर घनःश्याम सोनटक्के आणि नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश कटारिया (मेरठ, उत्तरप्रदेश), सामाजिक कार्यकर्ते त्रिरत्नकुमार भवरे (नांदेड) व आणखी कांही मान्यवरांना क्रांतीकारी संत कबीर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रीय कवी मधू बावलकर (आदिलाबाद) यांनी केली आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन सावित्रीमाई फुले यांचे नायगांव (सातारा) येथील वारस दिलीप गणपत नेवसे पाटील यांचे हस्ते होणार असून नेपाळचे मंत्री शत्रुघ्न प्रतापसिंह आणि पुणे येथील सत्यशोधक शिवदास महाजन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे. कवी नागनाथ डोलारे (मुंबई), सत्यशोधक रविनाथ डोलारे (पुणे) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

सुप्रसिध्द कवी चंद्रकांत वंजारे (आर्णी) यांच्या नेतृत्वात देशभरातील निवडक कवींचे कवी संमेलन यावेळी होणार आहे. प्रदीप फुलझेले यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमास देशविदेशातून साहित्यिक लेखक कवी विचारवंत व पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
