बारूळ| कंधार तालुक्यातील महादेव मंदिर ते बारूळ कॅम्प हा अतिशय महत्त्वाचा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून धुळीच्या विळख्यात अडकला आहे. रस्त्यावर सिमेंट काँक्रीट आणि नालीचे काम निकृष्ट पद्धतीने केल्याने ते काम बंद पडले. मात्र, सर्वात मोठी समस्या म्हणजे या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे उठणारी प्रचंड धूळ, जी आता स्थानिकांसाठी आरोग्याचा गंभीर प्रश्न बनली आहे.


नागरिक सांगतात की, “या रस्त्यावर एखादा माणूस पाच मिनिटे थांबला तरी त्याचा चेहरा धुळीनं पांढरा पडतो. इतक्या धुळीत आम्ही राहत आहोत, पण प्रशासनाला आणि नेत्यांना काहीच देणंघेणं नाही.” स्थानिकांचा आरोप आहे की, प्रशासन झोपेत गेले आहे, लोकांच्या समस्यांकडे लक्षच नाही. अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देण्यात आली. तसेच वृत्तपत्रांतून वारंवार बातम्या देऊनही संबंधित विभागांनी दुर्लक्षच केले.


ग्रामस्थांचा सांगणे आहे की, “नेतेमंडळी येतात, आश्वासने देतात, आणि नंतर गायब होतात!” या रस्त्याचा वापर प्राथमिक आरोग्य केंद्र, महाविद्यालय, पोस्ट ऑफिस, कृषी कार्यालय, बँक, देवस्थान अशा अनेक ठिकाणी जाण्यासाठी होतो. त्यामुळे दिवसाचा बहुतांश वेळ हा परिसर धुळीने पांढरा दिसत आहे.


धुळीमुळे गंभीर आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून, दमा, श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, छातीत कफ, सर्दी, खोकला, अशा आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भागाचे “आमदार, स्थानिक अधिकारी, नेते कुणीही बारूळकडे फिरकत नाही. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारा वालि इथे नाही का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

एकूणच या प्रकारामुळे ‘जनता नाराज झाली असून, बारूळ ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,“प्रशासन आणि नेतेमंडळींवर आमचा विश्वास राहिलेला नाही. आता काम तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.” असेही काहींनी आमच्या प्रतिनिधिस बोलतांना सांगितलं.


