Saturday, May 16

In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील काही महिण्यापासून हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय कार्यालये ओस पडत आहेत. अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरीकांना रिकाम्या हाताने गावाकडे परतावे लागत आहे. तालूका दंडाधिकारी कार्यालयात तहसीलदार यांची सततची अनुपस्थिती राहत असल्याने नागरिकांची प्रचंड हेळसांड होत असून, दि. ७ रोजी तहसील कार्यालयात आलेल्या महिला आंदोलकांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करीत चक्क तहसीलदार यांच्या खुर्चिचाच ताबा घेतला होता.

IMG 20241009 151049 In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

हदगाव विधानसभा मतदार संघात येणाऱ्या हिमायतनगर तालुक्यात प्रशासकीय यंत्रना कुचकामी ठरत असून, अनेक कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्याच्या खुर्च्या दुपारनंतर रिकाम्या असलेल्या पहावयास मिळत आहेत. तालुक्यातील एकाही प्रशासकीय कार्यालयांवर लोक प्रतिनीधीची वचक राहीली नाही. त्यामुळे शेतकरी, निराधार, विद्यार्थी यासह लाडक्या बहिणींना तहसी, पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून चपला झिजवाव्या लागत आहेत. शासकीय कार्यालयात असे प्रकार चालत असताना देखील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने आमदार, खासदार फक्त मिरवण्यापुरते झाले असल्याचा आरोप जनता जनार्दन करीत आहेत.

हिमायतनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून १९ कोटी रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. ही योजना ही भ्रष्टाचारात रूतल्या गेली असून, ऐन पावसाळ्यात वार्ड क्र. ७ मध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर आली आहे. तेही नागरिकांच्या आंदोलनानंतर टँकर सुरू झाले असले तरी अजूनही नळयोजना कार्यान्वित झाली नसल्याने शहरवासीयांना आगामी काळात पाण्यासाठी मारामारी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील स्वच्छतेचे देखील तीनतेरा वाजले असून, महिन्याला लोकहो रुपये खर्चूनही शहरात घाणीचे साम्राज्य आणि डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांचे आतोग्य धोक्यात येऊ लागले आहे.

IMG 20241009 151114 In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

जवळपास २५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या हिमायतनगर शहराच्या नगरपंचायतीला कायम स्वरूपी सिईओ मिळत नाही. ही बाब मोठ्या दुर्दैवाची ठरत असून, येथे फक्त एका नायब तहसीलदार यांना सिईओचा अतिरिक्त चार्ज देऊन काम धकवले जात आहे. केवळ सुरु बसलेल्या कामाचे देयके काढण्यापुरते प्रभारी मुख्याधिकारी नेमून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम शहरात विकासाच्या नावावर सुरु असलेल्या बोगस कामाच्या दर्जावरून दिसून येत आहे.

तसेच तालूका कृषी कार्यालयात प्रभारी, पंचायत समितीतही तिच बोंब असून, ग्रामीण भागात ग्रामसेवक हा ग्रामविकासाचा कणा समजला जातो. परंतू ग्रामसेवक ही गावात येईना, तहसीलदार महोदयाच सातत्यानं गैरहजर राहत असल्याने त्यांचा कित्ता मंडळ अधिकारी व तलाठी व तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी गिरवीत आहेत. तालुक्यातील एकंबा येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण व त्यांना पाठींबा देण्यासाठी आलेल्या शेकडो आंदोलक महिला तहसील कार्यालयात दाखल झाल्या. 

IMG 20241009 151028 In Himayatnagar tehsil office : हिमायतनगर तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या अनुपस्थितीत आंदोलक महिलांनी घेतला खुर्चीचा ताबा -NNL

परंतू तहसीलदार मॅडम उपस्थित नव्हत्या, म्हणून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करीत आंदोलक महिलांनी चक्क तहसीलदार यांच्या खुर्चीवर जावून तहसीलदार यांच्या खुर्चीचा ताबा घेऊन, इतर विभागातील अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या खुर्चीवर ताबा घेऊन प्रशासनाच्या हलगर्जी पणा बद्दल रोष व्यक्त केला आणि आमदार, खासदार फक्त मिरवण्यापुरते झाले असल्याचा आरोपहि केला आहे. आता जिल्हाधिकारी अभिजित राऊत व मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी हिमायतनगर येथील कार्यालयात असुर असलेल्या रामभरोसे कारभाराच्या गंभीर बाबींकडे तात्काळ लक्ष पुरवून तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेतील विस्कटलेली घडी निट करून नागरीकांना दिलासा द्यावा. अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.

हिमायतनगर येथील तालुका दंडाधिकारी कार्यालयासह, पंचायत समिती, भूमि अभिलेख, ट्रेझरी, कृषी यासह शहरातील विविध कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार वाढत चालला आहे. दुपारीच कार्यालयात शुकशुकाट पसरत असून, अधिकारी व कर्मचारी फिल्ड व मिटींगच्या नावाखाली सर्रास कार्यालयाला दांडी मारत आहेत. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने जावं लागत आहे. तात्काळ या भोंगळ कारभारात सुधारणा करावी अन्याथा जनहितार्थ आंदोलन करावे लागेल असा इशारा एम.आय.एम. चे हिमायतनगर तालुकाध्यक्ष अन्वरखान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!