नांदेड| पूर्णा तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगर टाकळी येथे श्री सद्गुरू दाजीमहाराज जन्मोत्सव व सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान ‘रौप्य महोत्सव’ निमित्ताने आयोजित ऋग्वेदांचे दशग्रंथ षडंगसहित संहिता पदक्रम पारायणास आज (बुधवार, ता.2 जानेवारी 2025) देशातील नामांकित घनपाठी वैदिकांच्या उपस्थितीत विधिवत सुरुवात झाली.
श्रीदाजी महाराज संस्थान,श्रीगंगाजीबापू गो सेवा प्रकल्प, सच्चीदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान व श्रीदाजी महाराज सेवा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने दि.2 ते 14 जानेवारी 2025 या कालावधीत धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, विविध स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत.
भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची भागवत कथा,प्रसिद्ध कीर्तनकारांचा नाम संकीर्तन सप्ताह, विविध क्षेत्रीय कर्तृत्ववानांचा कार्य गौरव इत्यादीचा समावेश आहे. आज ऋग्वेद संहिता व दशग्रंथ आदींच्या पारायणास सुरुवात झाली .संस्थानाधिपती व मुख्य यजमान उमेश महाराज टाकळीकर व सौ. अपर्णा टाकळीकर आणि सहयजमान वेदमूर्ती अवधूत महाराज व सौ.अश्विनी टाकळीकर यांच्या हस्ते वैदिक मंत्रघोषात विधिवत पूजन करण्यात आले.
या संहिता पदक्रम पारायणात वेदमूर्ती विद्यासागर देव (वाराणशी,उत्तरप्रदेश), वेदभूष ण अभिनव जोशी (हैदराबाद, तेलंगणा), वेदालंकार पवन कुलकर्णी (धारवाड,कर्नाटक),वेदमूर्ती विजयेश सहकारी (गोवा) यांच्यासह महाराष्ट्रातील वेदमूर्ती माधव परांजपे,सुशील पाटील,समीर मिराशी,मनोज जोगळेकर,सिध्दांत जोशी,मधुर लंगरे ,मंदार क्षीरसागर(सर्व पुणे),वल्लभ मुंडले (सिंधुदुर्ग),विक्रांत पांडे (नागपूर),निखिल जोशी (जिंतूर) इत्यादी घनपाठी वैदिकवृंद सहभागी झाले आहेत. दि. सात जानेवारी पर्यंत हे पारायण ज्ञानयज्ञ चालू राहणार आहे,अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ.हरिभाऊआ पाटील यांनी दिली.
प्रज्ञा व प्रतिभेचे दिव्यदर्शन
सहभागी वैदिकांमध्ये उच्चविद्याविभूषित असून काही जणांना ऋग्वेद संहिता,दशग्रंथ पूर्णतः पाठांतर झाले आहे .विशिष्ट लय,ताल व आरोह – अवरोहाच्या सुरातील अत्यंत खणखणीतपणे मुखोद् गत मंत्रजागर वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. देशभरातील या क्षेत्रातील दिग्गज आपल्या प्रज्ञा व प्रतिभेचे दर्शन टाकळीत घडविणार आहेत.