किनवट, परमेश्वर पेशवे| इसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्याची मागणी परोटी तांडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेलगत वाहणारी पैनगंगा नदी यंदा डिसेंबर महिन्यातच कोरडी पडली असून या नदीच्या लगत असलेल्या हदगाव, हिमायतनगर, किनवट तालुक्यातील गावासह अन्य गावच्या हजारो हेक्टर वरील जमीन व जमिनी वरील पिके पाण्या अभावी धोक्यात आली आहे.
या नदी लगतच्या हजारो हेक्टर वरील शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली असून पाण्या अभावी रब्बी पिके जाण्याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. तर रब्बी पिकासह जनावराचा पाण्याचा पुढील प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात नदीपात्र कोरडेठाक पडलेली दिसत असुन यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर न झाल्याने म्हणावे तसे नदी पात्रात पाणी नाही. त्यामुळे या नदीपात्रा लगत असलेल्या हजारो हेक्टर वरील ओलीता खालील पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्याची मागणी परोटी तांडा येथील नारायण पोमा आडे , शेषेराव चव्हाण या शेतकऱ्यासह अन्य गावकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.