नांदेड| अवकाळी पाऊस व तुफान वादळी वार्यामुळे नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना शासनाच्यावतीने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.


सध्या अवकाळी पाऊस व वादळी वार्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. 19 मे रोजी सायंकाळी 5 वाजता नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे वादळी वारा व पावसाने अक्षरशः तांडव नृत्यू केले. डोंगरगाव परिसरात सोमवारी सायंकाळी वादळीवार्यासह पावसामुळे गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाली. पक्की घरांवर वीजेचे खांब कोसळून जीवनावश्यक वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच आडोशाला बसलेल्या सय्यद बंदगी पटेल यांच्यावर वृक्ष कोसळल्यामुळे गंभीर जखमी झाले. आणि शिवराज जाधव या व्यक्तीला वीजेचा शॉक बसून जखमी झाला असून जखमीवर उपचार चालू आहेत. व त्या जखमींना दोन लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी. शेतीतील भुईमुग, पालेभाज्या, जनावरांचे वैरण इ. प्रकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अन्यथा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.देवराव नारे, कॉ.प्रकाश बैलकवाड, कॉ.गणेश संदुपटला, कॉ.अब्दुल गफार आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
