नांदेड। सौ. प्रियंका अभिजित अन्नपुरे (वय ३२ वर्ष) हिचा शनिवार दि. २५ जानेवारी २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला असून त्यानंतर फेर शव विच्छेदना नंतर तब्बल ८४ तासांनी मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता तिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळशीराम नगर, मालेगाव रोड, तरोडा खु. नांदेड येथील शंकर विठ्ठल अन्नपुरे या उच्च विद्या विभूषित डाॅक्टरची सुशिक्षित सून व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नवा मोंढा नांदेड येथे नोकरीस असलेल्या अभिजित शंकर अन्नपुरे याची पत्नी सौ. प्रियंका अभिजित अन्नपुरे हिचा तुळशीराम नगर नांदेड येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळेस डाॅ. शंकर अन्नपुरे हा उच्च विद्याविभूषित असूनही त्याने ही बाब भाग्यनगर पोलिसांना किंवा प्रियंकाच्या जवळच्या नातेवाईकांना कळवली नाही. ही गंभीर चूक केल्याने संशय बळावला.

डाॅ. शंकर अन्नपुरेने परस्पर प्रेत शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे रात्री ९ वाजता आणून टाकले. त्यानंतर अत्यंत घाईगडबडीत २६ जानेवारी रोजी भल्या सकाळी पहाटे मॅनेज्ड पद्धतीने शवविच्छेदन करण्यात आले असा आरोप करुन नातेवाईकांनी पुनःश्च फेर शवविच्छेदनाची मागणी केली होती.

डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर देशमुख यांना शिष्टमंडळासह भेटून वारंवार विनंती करुनही कांहीही झाले तरी दुबार पोस्टमॉर्टेम मी करणार नाही अशी कठोर भूमिका त्यांनी घेतली होती. आमदार आणि आरोग्य मंत्र्यांनी फोन करुनही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. मग जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे रिपब्लिकन नेते रमेश सोनाळे, अ. भा. गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड आदींनी पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लेखी आदेश व भ्रमणध्वनीवर संपर्क करुन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फेर शवविच्छेदन करण्यास सांगितले.

यासाठी गुरु गोविंदसिंघ स्मृती शासकीय रुग्णालय नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी विष्णुपुरी येथे येऊन तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत ईन कॅमेरा फेर शवविच्छेदन करण्यात आले. ही प्रक्रीया पार पाडण्यासाठी सुमारे दहा तास वेळ लागला. मध्यंतरी सायंकाळी चार वाजता नातेवाईक व कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन आक्रमक भूमिका घेतली होती परंतु इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, माधव गायकवाड, भीमराव वाघमारे, व्यंकट कांबळे, चंद्रसेेन गंगासागरे, शिवराज कांबळे, संजय सोनटक्के, पोलीस कर्मचारी एस. बी. शिंदे, बजरंग जाधव, तारु आदींनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.
फेर पोस्टमार्टेम नंतर मंगळवारी रात्री ९ वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे शोकाकुल वातावरणात प्रियंका अन्नपुरेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस झालेल्या शोकसभेत इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनावर कडाडून हल्ला केला. अधिष्ठाता सुधीर देशमुख यांनी त्यांच्या डाॅक्टर्सना वाचविण्यासाठी अडेतट्टूची भूमिका घेतल्याने अंत्यसंस्कारास भरपूर विलंब झाला म्हणून अधिष्ठाता आणि डाॅक्टर्सनाही सहआरोपी करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली व निषेध नोंदविण्यात आला.
प्रसेनजीत मांजरमकर, सुरेश शेळके, महेंद्रकर, संजय शेळके, श्रीनिवास कांबळे, बाबुराव मिनकीकर, हणमंत निंबाळकर, लखन मिनकीकर, प्रा. नागनाथ गिरगावकर, विशाल बनसोडे, एकनाथ मिनकीकर, शिवाजी सोनटक्के, दिगांबर पडलवार, बळीराम कांबळे, मुनेश्वर, बालाजी देशमाने, गंगासागर किशन कमलेश्वर, प्रसाद कमलेश्वर, इंजि. पोवळे, सुनिल माहूरे, पिराजी सोनटक्के, बालाजी सांगवीकर, मारोती गायकवाड, एकनाथ मिनकीकर, गोदावरी गंगासागरे, कौशल्याबाई सुर्यवंशी, शशीकला मिनकीकर, कौशल्याबाई घडलिंगे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आरोपींची तुरुंगात रवानगी !
मयत प्रियंकाचा डाॅक्टर सासरा शंकर अन्नपुरे, बँक कर्मचारी पती अभीजीत अन्नपुरे, सासू सीमा अन्नपुरे यांना मंगळवारी न्यायालयात पुन्हा एकदा हजर केले असता बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आल्याचे समजते. ननंद अश्वीनी अन्नपुरे ही फरार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणात सविस्तर घटनाक्रम पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कानावर घालण्यासाठी लवकरच अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शिष्टमंडळ भेटीस जाऊन लेखी निवेदन सादर करणार आहे.