देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.


थडी बोरगाव माहेर असलेल्या व नंदगाव (ता. मुखेड) येथे सासरी असलेल्या सोनाबाई मारुती गवते या महिलेची 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री प्रसूतीसाठी दाखल करण्यात आली होती. 20 सप्टेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता तिची सिजेरियन प्रसूती झाली व मुलगा जन्माला आला. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे तिला अतिरक्तस्राव सुरू झाला. रक्तदाब अचानक कमी झाल्याने तिची प्रकृती बिघडत गेली.


रुग्णालयातील डॉक्टरांनी स्वतःच्या वाहनातून तिला नांदेडला हलवले. प्रथम गंगा हॉस्पिटलमध्ये नेले असता ऍडमिट न करता परत पाठवले. त्यानंतर यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी सोनाबाईला मृत घोषित केले.


20 सप्टेंबरच्या संध्याकाळी तिचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात आले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारात आणून ठेवला. हे वृत्त लिहीपर्यंत मृतदेह तेथेच होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



