नांदेड| तख्त सचखंड श्री हजुर साहिब गुरूद्वा येथे स्थानिक सिख समाजातील लोकांना लोकशाही पद्धतीने कार्य करण्यासाठी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी अध्यादेश काढून न्याय द्यावा, अशी मागणी स.रणजितसिंघ गील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, पालकमंत्री गिरीष महाजन यांना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये ब्राम्हण व राजपुत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली याबद्दल आपले मनपुर्वक आभार, इतर समाजाला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमाने आरक्षण व इतर सवलती सुद्धा शासन देत आहेत. सिख समाजाला आजपर्यंत कोणतेही आरक्षण किंवा सवलती दिल्या नाहीत. उलट वेळोवेळी नांदेड येथील तख्त सचखंड गुरूद्वारा मालकीची हजारो एकर जागा विकासासाठी घेण्यात आली. तसेच मागील खुप वर्षापासून गुरूद्वारा बोर्डावर प्रशासक किंवा शासन नियुक्त अध्यक्ष नेमण्यात येत आहे.
आम्हास आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या नाहीत. परंतु आमचे धार्मिक स्थळी तरी आम्हा स्थानिक सिख समुदायास लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन चालविण्यासाठी मंजुरी देण्यात यावी. तसेच पंचप्यारे साहिबान यांच्या समक्ष झालेल्या बैठकीतील ठरावाची प्रत आपणास यापूर्वी दिलेली आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने अध्यक्ष निवडण्याचा व स्थानिक सदस्यांची संख्या जास्त असण्या बाबत कायदा अस्तित्वात येईपर्यंत अध्यादेश काढून निवडणुका तरी घोषीत कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.