हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल भगत यांनी आदर्श गाव टेंभुर्णी येथे भेट देत गावातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीमध्ये ग्राम सुरक्षा दल, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार, तंटामुक्त समिती अध्यक्ष तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुण यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


पोलिस निरीक्षक भगत यांनी गावातील सुरक्षा व्यवस्था, महिला अत्याचार प्रतिबंध, लहान मुलांची सुरक्षा, तसेच सद्यस्थितीत तालुक्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत मार्गदर्शन केले. जातीय तणाव टाळण्यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहावे, अफवा पसरवू नयेत व कायद्याचे पालन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी बिट जमादार बालाजी पाटील व जमादार पठाण उपस्थित होते.


पोलिस निरीक्षकांच्या भेटीमुळे गावात समाधानाचे व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांनी त्यांचे मनापासून स्वागत करून आभार व्यक्त केले. “गावाला भेट देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणारे निरीक्षक क्वचितच पाहायला मिळतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शांतता, सुव्यवस्था, चोरी-चपाटी तसेच अवैध दारू विक्रीवर निश्चितच आळा बसेल आणि गाव भयमुक्त बनेल,” असे मत सरपंचांनी व्यक्त केले.



