उस्माननगर, माणिक भिसे l उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वाका (ता. लोहा ) शिवारात अज्ञात मारेकऱ्यांकडून एका शेतकऱ्याची धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना दिनांक चार डिसेंबर बुधवारी पहाटे पाचच्या दरम्यान घडली. दरम्यान या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाच्या सूचना करण्यात आल्या असून तपासकामी वेगवेगळी दोन पथके रवाना झाली आहेत .अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध उस्माननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
उस्माननगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे वाका येथील पशुपालक अल्पभूधारक शेतकरी किशन हरी खोसे (वय 65 ) हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतआखाडयाकडे दूध काढण्यासाठी हातात स्टीलचा कॅन घेऊन पहाटे पाच वाजता घरून जात होते .याच दरम्यान गावापासून काही अंतरावर अज्ञात मारेकर्यांनी पाठीमागून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला.
याच पद्धतीने २०२१ मध्ये मे महिन्यात मयत किशन खोसे यांचा मुलगा वशिष्ठ खोसे या तरुणाचा अंगणात झोपलेले असताना याच पद्धतीने गळ्यावर धारदार शस्त्राने खून केला होता. त्या अगोदर भाचा आनंद झोटलींग यांच्यावर ही प्राणघातक हल्ला झाला होता. मात्र त्यात भाचा बचावला ,पण वशिष्ठ खोसे या तरुणाचा खून झाला. मात्र पोलीस तपासात खरा गुन्हेगार सापडला नाही. परिणामी निर्भिड बनलेल्या अज्ञात मारेकर्यांनी परत बापाला संपविले. एकंदरीत ही हत्या का? व कशासाठी झाली हे अद्याप ,तरी पुढे आले नाही .
आता तरी पोलिसांचा ठोस व निर्णायक तपास झाला नसल्यानेच खुणाची पुनरावर्ती घडल्याची चर्चा दबक्या आवाजात गावात ऐकायला येत आहे. या घटनेची माहिती उस्माननगर पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला. श्वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. व शेरू नावाचा श्वान दोनशे मिटर अंतरापर्यंत माग काढत काही ठिकाणी घुटमळला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार ,भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय ठाणेप्रमुख चंद्रकांत पवार, पीएसआय गजानन गाडेकर यांनी घटनास्थळास भेट देऊन तपास कामी वेगवेगळ्या ठिकाणी दोन पथके पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस अधिका-यानी दिली. याप्रकरणी फिर्यादी परमेश्वर किशन खोसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार दिली , यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.