किनवट| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून २५ मार्च रोजी सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, १४ ऑक्टोंबर२०२४ च्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प २०२४, पुरवणी मागण्या २०२५ व अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद न केल्याच्या राज्यांतील सर्व अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळांनी दि.१० ऑक्टोंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेने दि.१४ ऑक्टोंबर २०२४ चा शासन निर्णय काढला यासाठी सातत्याने राज्यात तसेच आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते.


या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून शासन निर्णयातील एकूण पात्र ५२ हजार पदांना शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या हेडनिहाय अनिवार्य खर्च म्हणून नागपूर येथील डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद होणे अपेक्षित होते परंतु शिक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्री उपलब्ध न झाल्याने या विषयाची पुरवणी मागणी मंजूर झाली नाही असे असंवैधानिक उत्तर राज्यातील शिक्षकांना देण्यात आले परंतु समाज घडवणाऱ्या या शिक्षकांनी मोठ्या मनाने “चला पुढे जाऊया” या संकल्पनेतून निदान अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्या किंवा पूर्ण अर्थसंकल्पात तरतूद होईल अशी भाबडी अपेक्षा सरकारकडे ठेवली तसेच राज्यात सरकार विरोधात कुठेही आंदोलन उभे केले नाही.

परंतु पुरवणी मागण्या व पूर्ण अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या शासन निर्णयातील पदांना टप्पा वाढीसाठी अपेक्षित तरतूद या शासनाने न केल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व त्यातूनच परवा राज्यातील बीड येथील धनजंय नागरगोजे सर यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर आणखीन अन्य ४ बांधवांचा नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला हे झालेले मृत्यू नैसर्गिक नसून सदरील शिक्षकांची हत्या ही शासनाने केलेली आहे शासन एकीकडे मंत्रिमंडळात निर्णय घेऊन त्यांचा शासन निर्णय काढत असेल व त्यास निधी मंजूर करत नसेल तर हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे.

त्यामुळे राज्यातील तमाम ५२ हजार शिक्षकांची शुद्ध फसवणूक आहे अशी भावना आम्हा शिक्षक बांधवात निर्माण झाल्याने आता या राज्य सरकारवर कुठलाही विश्वास आमचा उरलेला नाही आमची मागणी ही अत्यंत जुनी २० वर्षापासून ची ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांची असून या मागणीसाठी अत्यंत तोकडी रक्कम म्हणजे फक्त ८२६ कोटी रुपयांची असताना तसेच शेकडो आंदोलने,लाठीमार,तुरुंगवास ह्या शिक्षकांनी सोसलेला असताना शासन जर दिवसाढवळ्या बुद्धिजीवी शिक्षकांची अशी शुद्ध फसवणूक करत असेल तर आमच्यासमोर आता जिवंतपणी मेल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आम्हाला शिल्लक दिसत नसल्याने आम्ही दि. २५ मार्च २०२५ मंगळवार रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १.०० वाजता निवेदना सोबतच्या सहपत्रावर सह्या असणारे सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्चमाधामिक अंशतः शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधव सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर बळीराम घुगे, संतोष डवरे, प्रतिभा जळकोटकर, गणेश शक्करगे, गायकवाड नंदकुमार, फुलचंद केदार, अशोक तोंडे, सुनिल अनंतवार, हरीश डहाके, ज्ञानेश्र्वर पिठ्लवाड, वैशाली भगत, ज्ञानेश्र्वर करले, नवीन राठोड, रमेश ढाले, श्री.लांब एस. आर.,वागतकर सर, गालेवार पि. आर., तूम्मलवार जि. बी., गज्जलवार ए. बी., झुंजारे के. सि., मठदेवरू एम. जी, बळते मारोती, श्रीमती वाघमारे एस. यु, श्रीमती कावळे पि. एन., श्री. एस. डी. पवार, आर. आय. राठोड, नागरगोजे एस. बि., घुले बी. एस., मुंडे व्ही.व्ही, आदींनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदन देऊन दिला आहे तसेच समन्वय संघाचे अरविंद राठोड सर,सुग्रीव मुंडे सर, हरडपकर सर,यांनी सदरील कामास विशेष असे सहकार्य केले. तसेच तालुक्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
आमच्या मूत्यू पश्चात आमच्या मुलाबाळांची व कुंटुबांच्या पुर्नवसनाची जबाबदार ही शासनाने घ्यावी तसेच आत्मदहन आंदोलना दरम्यान झालेल्या मूत्यूला सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल यांची नोंद घ्यावी,आत्मदहनाच्या मृत्यूनंतर शरीरातील जे काही अवयव चांगले असतील तर ते अवयव सुद्धा आम्ही दान करीत आहोत आमचा कुठलाही अंत्यसंस्कार करू नये किंवा आमचे शरीर आमच्या कुटुंबाकडे सोपवू नये, अशी संताप जनक मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.