नांदेड l सीटू संलग्न मजदूर युनियनच्या बाह्यस्रोत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे २० फेब्रुवारी पासून जिल्हा परिषदे समोर उपोषण सुरु आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रामाबाद, खानापूर आणि येवती ता. मुखेड व प्राआकें सिरजखोड ता. धर्माबाद जि. नांदेड येथील युवक विविध एजन्सीज मार्फत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत.


त्यापैकी ईशा, जीत, शुभम, एसएस इंटरप्राजेस, एएनएक्सवाय व इतर बाह्यस्रोत कामगार पुरविणाऱ्या एजन्सीजने मागील १० ते ११ महिन्यापासूनचे मानधन थकविले आहे. सदरील कंपनीचे प्रमुख जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्य कर्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना जुमानत नसून काय करायचे करून घ्या अशी भाषा वापरत आहेत.

मूळ मालक जिल्हापरिषद आस्थापना असल्यामुळे वेतन करण्याची मुख्य जबाबदारी ही जिल्हा परिषदेचीच आहे. मुख्य लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा परिषदेणे वेतन अदा करणे हा एक पर्याय सध्यातरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आहे.

सदरील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन असणाऱ्या काही कंपनीचे टेंडर २८ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार असल्यामुळे आमरण उपोषण करण्याचा मार्ग कामगारांनी अवलंबीला आहे. ८ ते १० हजार पगारावर काम करणारे १० महिन्यापासून पगार नसल्याने अत्यंत अडचणीत सापडले आहेत.

उपोषणार्थी गजानन धुमाळे, तुकाराम जाधव, शेख लतीफ,राजीव वडजे,विष्णुकांत त्रिमलवार,संतोष गायकवाड, उमाकांत पिंपरे, इरफान शेख,स्वप्नील शिंदे,बोइनवाड लोकड, मयूर नाईक,ज्योती देवकांबळे, आनंद बोडके आदिजन उपोषणार्थी व पीडित असून दोघांची तब्येत खालावली आहे.
उपोषणार्थी तुकाराम जाधव यास अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
तर अजून एकाची तब्येत खालवली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवालयांनी लक्ष घालावे व आरोग्य अभियानातून पर्यायी मार्गाचा अवलंब करून पगार करावी अशी विनंती सीटू कामगार संघटनेने केली आहे. जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणार्थीची आहे. अशी माहिती संघटनचे उपाध्यक्ष गजानन पाटील धुमाळे यांनी दिली आहे.