नांदेड| जनतेतून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडून आलो, तर कार्यकर्त्यांना योग्य ती संधी देता येईल, शासन स्तरावर जनतेची कामेही सन्मानपूर्वक करता येतील, त्यामुळे पुन्हा विधान परिषदेवर न जाता आपण निवडणुकीला सामोरे जावे, असा असा मनाशी पक्का निर्धार करून आपण लोकसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहोत, त्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे सहकार्य आपल्या पाठीशी राहील, असा आत्मविश्वास माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रातोळी येथे आयोजित देगलूर-बिलोली व नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद व स्नेहभोजन मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले,आपण भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना शासनस्तरावर जी कामे सन्मानपूर्वक झाली, त्या तुलनेत विधान परिषद सदस्य असताना 25 टक्केही झाली नाहीत.

जनतेतून निवडून आल्याशिवाय कार्यकर्त्यांना, जनतेला न्याय देता येत नाही, कामे करताना अनेक अडचणी येतात. लोकसभेची उमेदवारी मलाच मिळावी, असा माझा आग्रह नसला तरी उमेदवारी देताना सर्वांशी चर्चा करून, सर्वांना विश्वासात घेऊन उमेदवारी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 2019 मध्ये ज्या पद्धतीने नेत्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केले, त्याच पद्धतीने 2024 च्या निवडणुकीत माझ्यासह सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व खा.अशोकराव चव्हाण तसेच प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एकत्र बसून, चर्चा करून ही निवडणूक जिंकून आणली पाहिजे, असे सांगून रातोळीकर यांनी आगामी काळात नांदेड जिल्ह्यालाही विधान परिषदेच्या दोन जागा मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी कोणालाही मिळो, आपला उमेदवार कमळ हे चिन्ह समजून कार्यकर्त्यांना झटून कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. लवकरच मुखेड विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

जातीपातीचे राजकारण नको-बच्चेवार
सद्यस्थितीत राजकारण अत्यंत हीन दर्जाचे बनले आहे, जाती-पातीचे राजकारण सुरु असून केवळ एका जातीपुरतेच राजकारण न राहता सर्वसमावेशक नेतृत्व होणे गरजेचे आहे. सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे मत प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले.
इमानेइतबारे काम करू-कुंटूरकर
आगामी पोटनिवडणुकीत तिकीट कोणालाही मिळाले तरी कुंटूरकर परिवार त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून इमानेइतबारे काम करणार, विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी कार्यकर्त्यानी सज्ज रहावे, असे आवाहन केले. यावेळी अशोक पाटील मुगावकर, धनराज शिरोळे, शिवराज गाडीवान, निलेश देशमुख,चंदू पाटील सावळीकर, अनिल पाटील खानापूरकर यांचीही भाषणे झाली.