किनवट,परमेश्वर पेशवे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी किनवट व गोकुंदा शहरात प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात मर्यादा पुरुषोत्तम जय श्री रामाचा जयघोष करत, गजरात साजरा करण्यात आला. परिणामी अवघी किनवट नगरी दणाणली होती.


भगव्या पताका, भगव्या झेंड्यांनी अवघे शहर भव्यमय झाले होते. दरम्यान शहरातील रामनगर येथील श्रीराम मंदिरात लोकनेते आमदार भीमराव केराम यांनी श्रद्धा भावाने प्रभू श्री रामाची पूजा केली. सकाळपासूनच प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रांग लागली होती. मतदारसंघातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच तालुक्यातील रामभक्तांनी श्रीराम भक्त मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले. दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील मुस्लिम समाजातील युवा नेतृत्व मुसाखान यांनी बुंदीचा अल्पोहार व फिल्टर पाण्याची व्यवस्था स्वखर्चाने केली होती. हा एक हिंदू मुस्लिम धर्मातला एकोप्याचा संदेश, बंधूभाव दिसून आला.


दरम्यान त्यांचा श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने अत्यंत चौक नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान रामनगर येथील मंदिरापासून प्रभू श्रीरामाच्या भव्य मूर्तीची मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांनी काढण्यात आली. दरम्यान हजारो श्रीराम भक्त मिरवणुकीत भगवे वस्त्र परिधान करून सामील झाले होते. प्रभू श्रीरामाच्या गीतावर व डीजेच्या तालावर तरुणाई थीरकली होती.


अत्यंत भक्तिमय वातावरणात, प्रचंड उत्साह, श्रीराम भक्तामध्ये दिसून आला. दरम्यान पोलीस प्रशासना कडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मिरवणूक अत्यंत शांतपणे व कुठेही गालबोट न लागता प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.



