नांदेड, अनिल मादसवार| हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” आयोजित करून गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे.

यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. जगातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजे गणेश उत्सव असून, या उत्सवाचे औचित्य साधून सार्वजनिक गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या वतीने विविध देखावे, सजावट आणि विविध उपक्रम राबवल्या जातात. गणेश भक्तांच्या उपक्रमांना चालना मिळावी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील गणेश मंडळ व गणेश भक्तांना आपली कला दाखवण्याची सुवर्णसंधी मिळावी यासाठी गणेशोत्सव – २०२४ निमित्त “सुंदर माझा बाप्पा स्पर्धा” आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळ व गणेश भक्तांना प्रथम पारितोषिक – ५१,०००/-, द्वितीय पारितोषिक – २१,०००/-, तृतीय पारितोषिक – १५,०००/-, उत्तेजनार्थ -११,०००/-, उत्तेजनार्थ – ७,०००/- असे बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.


या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळ व गणेश भक्तांना पुढील नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यात १) स्पर्धा ही ऑनलाइन स्वरूपाची असेल. 2) व्हिडिओ दोन ते चार मिनिटांचा असावा. 3) एका स्पर्धकाला केवळ एक व्हिडिओ पाठवता येईल, तो व्हिडिओ गणेश मंडळाच्या नावाने पाठवावा. 4) व्हिडिओमध्ये सजावट आणि त्याच बरोबर ज्या व्हिडिओला सगळ्यात जास्त Views, Likes, Comments and Shares असतील त्याला पारितोषिक देण्यात येईल. 5) परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.


स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांची आपल्या गणपती बाप्पासह समोरील विविध देखावे, सजावट आदी व्हिडिओ पाठवण्याची तारीख १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर पर्यंत पाठवावे लागणार आहेत. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकाशी : 7620375123, 9673931107, 9767460224 वर संपर्क साधावा असे आवाहन स्पर्धेच्या आयोजक डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर, प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस, प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा महिला काँग्रेस, ८४ हदगाव हिमायतनगर विधानसभा यांनी केले आहे.


