श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| सहायक जिल्हाधिकारी कार्यालय, किनवट कडून माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रालगत असलेल्या टाकळी(लिबायत) गावातून बेकायदेशीर साठवणूक करून ठेवण्यात आलेल्या १६० ब्रास रेती जप्त करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यांचा सात महिण्यापुर्वी लिलाव केला होता.
लिलावातून मिळणाऱ्या साठ्याची रॉयल्टी देण्यात आली असून त्याचा कालावधी १ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी पर्यंत आहे. परंतु जायमोक्या वरून वाळू वाहतूक करण्यात येत नसून थेट पैनगंगा नदीपात्रातून २५ ते ३० टिप्पर, टॅक्टर द्वारे अवैध वाळू उपसा दिवस रात्र सूरू आहे परंतु महसूल व पोलीस गांधारी ची भुमीका घेत आहेत
स्थानिक वाळूचोर अनधिकृतपणे वाळूचा साठा करून ठेवतात व स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून साठा केलेल्या वाळूचा जप्ती पंचनामा करायला लावतात. त्यानंतर त्याचा लिलाव आयोजित केला जातो. त्या लिलावात ती वाळू साठवणूक केलेले वाळूचोरच ऑफसेट किमतीच्या कितीतरी पटींनी जास्त बोली लावतात आणि वाळूसाठा घेतात.
लिलावातून मिळणाऱ्या साठ्याच्या रॉयल्टीवर पुन्हा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळूचे अमाप उत्खनन करतात. ही माहूर तालुक्यातील प्रचलित पद्धत आहे. अशा वेळेस मात्र महसूलचे अधिकारी व कर्मचारी वाळूचोरट्यांकडे रॉयल्टी असल्याची बतावणी करून अर्थपूर्ण संबंधातून वाळूचोरीकडे दुर्लक्ष करतात. हा लिलाव वाळूचोरीला एक प्रकारे प्रोत्साहन देणारा ठरणार असून, वाळूचोरांना लाभदायी ठरणारा आहे