नांदेड| शिक्षकी जीवन संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या घडणुकीसाठी वाहून घेतलेल्या जिल्हा परिषदेतील 259 शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. 2005 पूर्वी जाहिरात व अधिसूचना निघालेल्या, मात्र नियुक्ती 1 सप्टेंबर 2005 नंतर झालेल्या या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी नुकतेच निर्गमित कले आहेत, यामुळे शिक्षक वर्गात आनंद व समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.


हा निर्णय म्हणजे शिक्षकी जीवनातील निष्ठेचा, समर्पणाचा व न्यायाच्या प्रतीक्षेचा सन्मान आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने हा विषय काटेकोरपणे हाताळला. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, स्मिता पोपुलवार, मंगेश ढेंबरे व विक्रम रेनगुंटवार यांनी प्रभावी पाठपुरावा केला.

या निर्णयामुळे शिक्षकांना केवळ आर्थिक स्थैर्य मिळणार नाही, तर त्यांच्या सेवेचा सन्मानही होत आहे. अनेक शिक्षकांनी म्हटले, हा आमच्या शिक्षकी जीवनातील सर्वात मोठा निर्णय आहे. शिक्षकांनी हा निर्णय ऐतिहासिक ठरवत जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाचे विशेष अभिनंदन केले आहे.
