निवडणूक प्रचाराला चांगलीच सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार पाठविण्याची ही निवडणूक आहे. यातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोक प्रतिनिधी निवडायचे आहेत. काही पढतमुर्खांना हे अजून नीट समजलेले दिसत नाही. त्यांना वाटत असेल मंदिरात पुजारी पाठवायची ही निवडणूक आहे, म्हणून मंदिरात व मठात सनातनी महाराज लोकांना बोलाऊन पुजापाठ करुन निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यात येत आहे.
सर्व पक्षात नाक खुपसून झाल्यावर सर्वांचा जोरदार ठोसा खाऊन लालबुंद झालेले नाक घेऊन आता अपक्ष म्हणून राखीव मतदार संघात उभा राहिलेल्या एका मागासवर्गीय उमेदवाराने सगरोळी येथील एका मंदिरातून व मठातून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. म्हणजे असे केल्याने लोक धार्मिक भावनेतून आपल्यालाच मतदान करतील असा गोड गैरसमज या उमेदवाराचा झाला असावा !
या आपल्या देशात दलितांना शिकण्याचा, लिहिण्याचा, रस्त्यावरुन चालण्याचा आणि बोलण्याचा हक्क आणि अधिकार नव्हता. महामानवांच्या संघर्षातून आपणाला हे सारे मिळाले, याचा विसर दलितांना पडू लागला आणि ते जात लपऊन फिरु लागले. दिसायला गोरे गोमटे आहोत म्हणजे आपण दलित नाही सवर्ण आहोत, असे समजून खाली न पाहता वर पाहणारे भरपूर ठोंबे तयार झाले आहेत. उच्चवर्णीयांना माथा आणि दलितांना लाथा असे वागणारा कुणी दिसला तर म्हणावे वाटते, अरे शिकून सवरुनी असा कसा गेला वाया..?
तिकीटासाठी ईकडे तिकडे भटकत असलेल्या चांभार जातीच्या या पठ्याला बहुजन समाज पक्षाचे तिकीट घेऊन उभे रहा असे म्हटल्यावर हा म्हणाला की, नको… नको… माझे सवर्ण लोकांत बसणे उठणे आहे. त्यांच्याच मतांवर मी निवडून येणार आहे. मी मागासवर्गीय जातीचा असल्याने या जातींचे मतदान तर मलाच होणार आहे, त्यामुळे यांना जास्तीचे भाव देण्याची गरज नाही. बसपाच्या तिकीटाची मला गरज नाही. गरज वाटल्यास बसपाने मला बाहेरुन पाठिंबा द्यावा.
अशी महान विचारसरणी असलेल्या या दलित जातीत जन्म घेतलेल्या या दलित द्वेष्ट्या महाशयाने निवडणूक लागण्यापूर्वी सहा महिन्यांपासून गावाकडे व देगलूर मतदार संघात चकरा मारायला सुरुवात केली. दर शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईहून देगलूर बिलोली राखीव मतदार संघात भारीच्या कारमधून फिरायचे. कुणाचीही मौत झाली असेल तर तिथे जाऊन अश्रू ढाळावेत. शोक व्यक्त करावा. श्रद्धांजली अर्पण करावी. ओळख ना पाळख, मान ना मान मै तेरा मेहमान असे बळजबरी गळ्याला पडायचे. याला असा माणुसकीचा भलताच गहिवर आलेला.
हा कळवळा सर्व जाती धर्मासाठी असावा पण हा पठ्ठ्या दलितांच्या मौतीत जात नाही. तिथे जाऊन आपल्या संवेदना व्यक्त करीत नाही. अगदी त्याच्या जातीचे, नात्याचे कुणी दगावले तरीही तो त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. लग्नाच्या बाबतीत असेच. तो कुणाच्याही लग्नात जाऊन अक्षता टाकणार. तिथे स्वतःच्या नावाची अनाउन्समेंट करणार. वधू वरांना चांगली गिफ्ट देणार. कुठे हरिनाम सप्ताह, भजन किर्तन किंवा कोणता धार्मिक कार्यक्रम असेल तर तिथे जाऊन विना गळ्यात घालून हा हरिनामाचा जप करणार तर कुठे टाळ हाती घेऊन हा पोज देऊन फोटो काढणार ! कुणाला देणग्या देणार तर कांही भंडारे प्रायोजित करणार ! हे सारे कशासाठी तर सहानूभूतीच्या मतांसाठी ? ही अशी धर्मांध निवडणूक प्रणाली या लोकशाही व्यवस्थेत निर्माण झाली आहे आणि म्हणे मला मतदार संघाचा विकास करायचा आहे. कसा करणार ? जसे आजवर झाले तसेच होणार… भर अब्दुल्ला, गुड थैली में !
गांधीवादाने फक्त “उंचा बनो !” हे शिकविले, त्याचा हा परिणाम असावा. “शूद्र पूर्वी कोण होते ?” याचा शोध घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांना समजून घेण्याचा, त्यांच्या “स्व”चा शोध घेण्याचा, त्यांना आपुलकीने जवळ करण्याचा, त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न केला, म्हणून दलित समाजात असे कांही उच्चपदस्थ अधिकारी तयार होऊ शकले. याची जाण आणि भान नसलेले हे असे स्वार्थी अधिकारी आमदार होण्यासाठी धडपड करताना पाहिले की आठवते, “मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया !” असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी का म्हटले असेल…?
पदावर असतांना या अशा संधी साधू अधिकाऱ्यांनी कधी ढुंकूनही समाजाकडे पाहिले नाही. गावाकडे फिरकले नाही. कधी उष्ट्या हाताने कावळा हाकलला नाही आणि आता भरमसाठ पैसे खर्चून “चला मुरारी आमदार बनणे !” हे सारे कशासाठी ? याला आमदार का व्हायचे आहे ? याचे एकच उत्तर असू शकते पैसा…पैसा आणि पैसा ! पैसा पेरा आणि पैसा कमवा !! अशा नकली व तकलादू समाज सेवकांना निवडणुकीत आसमान दाखविण्याचे काम मतदारांनी केले पाहिजे !
लेखक – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड. मो. ८५५४९९५३२०