नांदेड| समाजातील बंधुभाव, एकोपा, सलोखा घट्ट करण्यासाठी संत श्री नामदेव महाराज यांच्या कार्याला उजाळा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी येथे केले.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुल व नानक साई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री संत नामदेवजी महाराज: लौकिक व वाङ्मयीन योगदान’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, श्री गुरू गोविंदसिंघजी अध्यासन संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष सरदार लड्डूसिंग महाजन आदी उपस्थित होते.


डॉ. गायकवाड म्हणाले, ‘पंढरीच्या श्री विठ्ठलाचा समता, बंधुभावाचा संदेश देशभर पोहचवण्यासाठी संत नामदेवांनी भ्रमंती केली. पंजाबमध्ये जाऊन शीख धर्माचा पाया घातला. समाजातील विविध स्तरांमधून, उपेक्षित घटकांमधून संत घडवले. समाजात सलोख्याची भावना रुजवली. समाजातील हा एकोपा टिकवण्यासाठी आपणही त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे गरजेचे आहे. तेराव्या शतकात मराठवाड्यातील संत नामदेव महाराज यांनी दक्षिणेपासून ते पंजाब, उत्तर भारत आणि अफगाणिस्तान भागात जाऊन मानवता आणि भक्तिभावाची शिकवण दिली. समाजात समता, बंधुता ही मूल्ये आणखी मजबूत होतील, असे डॉ. गायकवाड म्हणाले.


यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन केंद्र हे आगामी काळात आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला. या केंद्रातून सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे व्याख्याने व नवीन अभ्यासक्रम राबविले जातील असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुलाचे संचालक डॉ. दीपक शिंदे यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार प्रा. रुबीया शेख यांनी मानले. कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विद्या परिषदेचे सदस्य डॉ. बाबुराव सुरवसे, पत्रकार आनंद कल्याणकर, प्रा. के.एच. दरक, शिंपी समाज संघटनेचे अध्यक्ष शंकरराव सिंगेवार, गुरुद्वारा बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्रसिंग सोडी, दैनिक सकाळचे उपसंपादक प्रसाद खेकाळे, डॉ. अविनाश कदम, यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्राचे शिवाजीराव गावंडे, धरामसिंग चव्हाण, रवींद्रसिंघ मोदी, आर.डी. सिंघ, डॉ. परवीदर कौर कोल्हापुरे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


