नांदेड। विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, उद्भवणाऱ्या समस्या व असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवल्यास कामे जलद गतीने होतील, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मुखेड तालुक्यातील खरब खडगाव, चांडोळा तांडा व बिल्लाळी गावांना भेट देत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, घरकुल तसेच ग्रामविकासाशी संबंधित अन्य कामे पाहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला तसेच त्यांची मते व अडचणी समजून घेतल्या.
बिल्लारी येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम प्रलंबित होते. या संदर्भात मीनल करनवाल यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. या कामांना सुरुवात करून सांडपाणी व्यवस्थापनासाठी सार्वजनिक शोषखड्डे व कचरा व्यवस्थापनासाठी नॅडेप व कचरा विलगीकरण शेड, घंटागाडी ही कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
चांडोळा तांडा येथे त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. ग्रामस्थांनी नवीन टाकीच्या मागणीवर चर्चा केली. यावेळी मीनल करनवाल यांनी जुन्या टाकीची पाहणी करून पुनर्वापराच्या सूचना दिल्या. खरब खंडगाव येथेही जलजीवन मिशनची कामे तपासून त्यांनी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना आखण्याचे आदेश दिले. दरम्यान या गावातील शाळांना भेट देत मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाबाबत त्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले.
गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. गावपातळीवरील समस्या समजून घेत कामे केल्यास ती वेळेत पूर्ण होऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या. या दोऱ्यात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, कार्यकारी अभियंता भोजराज, गट विकास अधिकारी शेखर रामोड, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीयसहाय्यक शुभम तेलवार आदींची उपस्थिती होती.
Post Views: 850