12th examination : माहूर तालुक्यातील ८३१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला मंगळवारी ११ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार असून तालुक्यातील कला विज्ञान व वाणिज्य विभागातील ८३१ विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. तालुक्यातील ४ परीक्षा केंद्रांवर त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कूष्णा भराडिया यांनी केले आहे.


राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाकडुन कॉपीमुक्त परीक्षेसाठी अनेक कठिण नियम करण्यात आले असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना बोर्डाच्या वतीने देण्यात आल्या आहे. त्यानुसार तालुक्यात बारावीची परीक्षा पारदर्शक कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी ५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील श्री जगदंबा विघालय १७२, श्री रेणुका देवी महाविद्यालय १९६,तर तालुक्यातील शंकरराव विघालय आष्टा १८७ , सावित्रीबाई फुले विघालय अंजनखेड २७६ परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून या ८३१ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था या परीक्षा केंद्रांवर करण्यात आली असल्याची माहिती परिरक्षक व्ही .के.आचणे व सहाय्यक परिरक्षक एस.एस. पाटील यांनी दिली आहे.

परीक्षा कॉपीमुक्त वातारवणात पार पाडण्यासाठी बोर्डाने कंबर कसल्याने आणि त्या अनुषंगाने कठोर निर्णयाची अमलबजावणी करण्यात येणार असल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची कसोटी लागणार आहे. मंगळवारी ११ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाच्या पेपरने या परीक्षेची सुरुवात होणार असून ११ मार्चला कला विभागातील विद्यार्थ्यांच्या समाजशास्त्र विषयाच्या पेपरने या परीक्षेची सांगता होणार आहे.





