नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने आपल्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी-कर्मचार्यांना एक दिलासादायक व आनंददायी निर्णय दिला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या मागण्या मान्य करुन तसेच आदेश निर्गमित केले आहेत. यात मे 2025च्या वेतनात 3% महागाई भत्ता व नैसर्गिक घरभाडे भत्त्याची वाढ देण्याचेही आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे मनपातील हजारो कर्मचारी लाभार्थी ठरणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत थोडा सकारात्मक बदल होणार आहे.


मनपा कामगार कर्मचारी युनियनच्यावतीने अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी ही मागणी मागील अनेक दिवसांपासून लावून धरली होती. दि. 29 मे रोजी मनपा कार्यालयासमोर सेवानिवृत्त, कार्यरत व कंत्राटी कर्मचार्यांना सोबत घेऊन द्वारसभा व धरणे आंदोलन करण्या आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी निवेदनातील मागण्या तर मान्य केल्याच पण घरभाडे भत्त्याची नैर्गिक वाढही देण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्यांसह कार्यरत अधिकारी, कर्मचार्यांना दिलासा दायक आहे. त्यामुळे मनपातील कर्मचार्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

उपायुक्त सुप्रिया टवारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. जनार्दन पकवाने, सहायक आयुक्त स्वच्छता व आस्थापना डॉ. जी. एम. सादेक, आर अँड बी कंपनीचे व्यवस्थापक अशोक पाल, नांदेड मनपा कामगारा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे, स्वच्छता विभागाचे चंद्रमुनी ओलेला यांच्या दि. 28 मे रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत नांदेड मनपा कामगार कर्मचारी युनियनच्या निवेदनावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचार्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन व कर्मचार्यांमध्ये विश्वासाचे व सहकार्याचे नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी मनपा कामगार कर्मचारी युनियन संस्थापक तथा अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांनी व्यक्त केला.

कॉ. गणेश शिंगे यांच्या पाठपुराव्याचे फलित!
कॉ. गणेश शिंगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, ठाम भूमिका आणि आंदोलनात्मक लढ्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय मना प्रशासनाकडून घेण्यात आला. कर्मचार्यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवणार्या कामगार कर्मचारी युनियनने या विषयाला चालना देऊन प्रशासनाकडून निर्णय घेण्यास भाग पाडले. त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनेने या प्रश्नाला जी तातडी व गांभीर्य दिले. त्याचेच फलित आज कर्मचार्यांना मिळाले आहे, याबद्दल मनपा कर्मचार्यांकडून कॉ. गणेश शिंगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मनपा सेवानिवृत्त कर्मचार्यांसह कार्यरत अधिकारी कर्मचार्यांना महागाई भत्त्यासह घरभाडे भत्ता मंजुर केल्याबाद्दल डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे शिंगे यांनी आभार मानले.
