नांदेड। संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यापूर्वी झालेला नागपूर करार तत्कालिन कॉंग्रेस अंतर्गत असला तरी तो मराठवाड्याच्या हिताचाच होता असे मत पीपल्स महाविद्यालयाचे प्रा.डॉ.अभय दातार व्यक्त केले.

मराठवाडा जनता विकास परिषद, नागरी विकास कृती समिती आणि पीपल्स महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्यावतीने नागपूर कराराच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय दातार यांचे व्याख्यान आयोजित केेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मजवीपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते. यावेळी बोलतांना डॉ.दातार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या दीड वर्षानंतर मोठ्या संघर्षातून हैद्राबाद संस्थान आणि मराठवाड्याचा भूभाग स्वतंत्र भारतात सामील झाला.

स्वातंत्र्यानंतर मराठवाडा हा आंधप्रदेशात सामील होता. हैद्राबाद राज्यातील मराठी भाषीकांना स्वतःचे राज्य असावे अशी अपेक्षा होती. हैद्राबाद येथे झालेल्या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात प.पु.स्वामी रामानंद तीर्थ यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा विरोध असतांनाही भाषावार प्रांत रचनेचा ठराव मांडला. फजलअली कमीशनच्या अहवालानंतर भाषावार प्रांत रचेनची मागणी सर्वत्र जोर धरत होती. विदर्भाचा भूभाग मध्यप्रांताशी जोडल्या गेलेला होता. मध्यप्रदेशची राजधानी नागपूर होती. संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर नागपूर शहराला असलेला राजधानीचा दर्जा संपुष्ठात येणार होता. त्यामुळे विदर्भातील काही लोकांचा संयुक्त महाराष्ट्रात सामील होण्यासाठी विरोध होता.

त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ व प्रभावी नेते शंकरराव देव यांनी मध्यस्थी करुन नागपूर करार घडवून आणला. हा करार खर्या अर्थाने कॉंग्रेस अंतर्गत होता. यात विदर्भ आणि मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याचमुळे नागपूर करार हा मराठवाड्याच्या हिताचाच होता असे म्हणावे लागेल, असे मत प्रा.डॉ.दातार यांनी यावेळी व्यक्त केले. अध्यक्ष समोराप करतांना माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी मोठ्या संघर्षानंतर संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. निझामकाळापासून मराठवाड्यातील भूभाग अविकसित आहे.

मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष शास्त्रशुध्द अभ्यासातून दूर करावा अशी मागणी घेवून मराठवाडा जनता विकास परिषद सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर यांनी केले. यावेळी पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम. जाधव, सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे, कॉ.आदिनाथ इंगोले, बालाजी टिमकीकर, ऍड.धोंडीबा पवार, डॉ.पुष्पा कोकीळ, प्रा.विकास सुकाळे, प्रा.कपिल धुतमल यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि मराठवाडा जनता विकास परिषद, नागरी कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.