नांदेड| केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्यामुळे आता नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असणे आवश्यक आहे. जर आपला खासदार नसेल तर आपल्याला निधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे विरोधी पक्षात जाऊन बसण्यापेक्षा सत्तेत सहभागी होऊन नांदेड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले.
भाजपाचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे हे काल नायगाव , नरसी दौऱ्यावर होते. नरसी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगाव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता उपस्थित कार्यकर्त्यांशी , पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. यावेळी खा. डॉ. अजित गोपछडे ,जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, माणिकराव लोहगावे , बजरंसिंह ठाकुर, बालाजी पाटील शेळगावकर , गणेश पाटील जाधव , सदाशिव कल्याणकर , कपिल यादव आदी उपस्थित होते.
डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा माणिकराव लोहगावे यांच्या वतीने आणि नरसी परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक टाळून सत्तेत सहभागी होण्यासाठी या वेळी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहणार आहोत असा विश्वास उपस्थित कार्यकर्ते , पदाधिकारी यांनी व्यक्त केला.
मी शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता आहे. शैक्षणिक चळवळीत गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे. त्यामुळे शेती माती आणि नाती यांची जाणीव असल्यामुळे खासदार झाल्यानंतर निश्चितपणे आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या भागात शैक्षणिक सुविधा अधिकाधिक उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास डॉ. हंबर्डे यांनी दिला.