लोहा| पूर्वीचा कंधार या विधानसभा मतदारसंघाला वैचारिक परंपरा आहे. या मतदारसंघातील काही भाग मुदखेड मतदार संघात होता आणि त्या भागाने या राज्याचे नेतृत्व केले. पर्यायाने आपल्या मतदार संघाने राज्याला मुख्यमंत्री तसेच दोन वेळा खासदार सुद्धा दिला. चळवळ ..संघर्ष..वैचारिक लढाई.. विविध सत्याग्रह.. शेतकरी आंदोलने… आणि थेट पंतप्रधान याच्याशी संवाद ही राजकीय पार्श्वभूमी असलेला मतदार संघ आता वैचारिकदृष्टया “दुबळा” तत्वहीन” होतो आहे की काय (?) अशी शंका उपस्थित होत आहे.


कोणतीही वैचारिक वा विकासाची पार्श्वभूमी नसलेले “अमाप व अनियंत्रित धनशक्तीच्या बळावर आपला जम बसू पाहत आहेत. लोकांनाही पैशाची आस लागली. कर्तृत्वशून्य असलेले लहान तोंडी मोठा घास घेत वाट्टेल ते बोलत आहेत. मतदारसंघ “प्रयोगशाळा”होऊ नये..वैचारिक आणि सकारात्मक राजकीय विरोधाची परंपरा असलेल्या या भूमीत पैसे दिले की मत मिळते. असा भ्रम “भावी ” व समर्थकांना वाटतो. “मतदारानी “पैशासाठी”उतावीळ न होता दूरदृष्टी ठेवायला पाहिजे सक्षम व सकारात्मक राजकीय लढत झाली पाहिजे असा सूर मतदार संघात उमटला आहे.

१९५२ ते २०१९ या काळात पूर्वी कंधार व आता लोहा विधानसभा मतदारसंघात टेकळीचे भूमिपुत्र ऍड गोविंदराव मोरे (१९५२) यांनी पाहिले आमदार होण्याचा बहुमान पटकाविला. श्रद्धेय भाई डॉ. केशवराव धोंडगे (१९५७ते१९९०), याच्या सारख्या विधिमंडळ गाजविणाऱ्या व अकरा मुख्यमंत्र्यां सोबत काम करणारे नेतृत्व या मतदारसंघाने घडविले. सयंमी शांत असलेले ऍड ईश्वरराव भोसीकर,(१९८०) भाई गुरुनाथराव कुरुडे(१९७७) ,सामान्य कुटुंबातील पुढे आलेले नेतृत्व शिवसेनेचे रोहिदास चव्हाण,(१९९५ व१९९९) राज्याच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व प्रचंड लोकसंग्रह असलेले प्रतापराव पाटील चिखलीकर, (२००४ व२०१५) शेतकऱ्यांना प्रश्नावर उभी हयात खर्ची घातलेले शंकर अण्णा धोंडगे,(२००९) सेवानिवृत्त सनदी अधिकारी व राज्याच्या प्रशासनात वेगवेगळ्या विभागाचे राज्य आयुक्त म्हणून काम करणारे श्यामसुंदर शिंदे (२०१९) यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.

भाई धोंडगे विरुद्ध भोसीकर,भाई , धोंडगे विरुद्ध चव्हाण, चिखलीकर विरुद्ध धोंडगे, चव्हाण विरुद्ध चिखलीकर, धोंडगे विरुद्ध धोंडगे आणि सगळे मिळून प्रतापरावांच्या विरोधात अशी राजकीय परिस्थिती या मतदारसंघात होती. तसेच लोह्याचे मुकदम, तेलंग, मंगनाळे, शिवराम पवार, लोह्याचे पवार पाटील , पांडागळे बोधगिरे, केंद्रे, कल्याणराव सुर्यवंशी , यशवंतराव पाटील, संभाजीराव धुतमल, लुंगारे परिवार, बबर साब अशी प्रमुख नेते मंडळी या मतदारसंघात आपला दबदबा ठेवून होती.विरोध तात्विक होता.टोकाचा असला तरी त्याचा स्तर माजघरा पर्यंत गेला नाही .लेकीबाळी पर्यंत तर कधीच नाही विरोध असला तरी सीमित होता. अलीकडच्या तीन चार वर्षात या मतदारसंघात सोशल मीडियाचा अवास्तव वापर झाला. ज्याला काहीच ज्ञान नाही असेही मोठ्या नेत्याना वाट्टेल ते बोलत आहेत ज्ञान पाजळत आहेत. पाच वर्षात मतदार खुश आहे की नाराज हे मतदान पेटीतून स्पष्ट होईल पण अधिकाराचे हस्तांतरण झाले हे चुकीचे घडले. आमदार शिंदे यांच्या अनु उपस्थितीत झालेले लोकार्पण ” चर्चेचा विषय बनला.

अलीकडच्या काळात जाहीर भाषणात भाषेचा स्तर खूपच पातळी सोडून होता. काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी जबाबदार व्यक्तीने बोलताना भान ठेवले पाहिजे. लोह्यात आमदार चिरंजीवाने प्राणिताताई याच्यावर वैयक्तिक खालच्या भाषेत टीका केली ती लोकांना रुचली नाही. प्राणिताताईं २००७ पासून या मतदारसंघात सक्रिय आहेत. त्या भाषणात कधीच अपशब्द बोलत नाही. टीका करत नाहीत. भाषा सुसंस्कृत असते. विरोधक खाजगीत बोलताना त्याच्या आदर करतात हे वास्तव होय. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि नात नात्याच्या ठिकाणी असायला हवे. पण राजकारणासाठी नातीगोती, सामाजिक कौटुंबिक भान, संस्कार, विसरून कोणीही वाट्टेल ते बोलत असेल तर लोकांना ते पचनी पडत नसते.ते तुलना करतात. अशी सवंग लोकप्रियता औटघटकेची ठरू शकते. अशांना उज्वल भविष्य नसते.
या मातीत ज्यांनी ४०-५०वर्ष झिजविले त्यांना हिशोब कोणी मागावा .आधी केले मग सांगितले अशांनी मागितला तर मतदार समजू शकतो .,पण २४×७ च्या प्रसिद्धी साठी हे सगळं सुरू असे दिसते .पण आता मतदार संघात वेगळंच सुरू आहे. पैसा ..पैसा..अन पैसा ..यावरच मतदार गृहीत धरत असतील तर ही त्याची राजकीय बालबुद्धिच मनावी लागेल.
या मतदारसंघाला मोठा इतिहास आहे. राज्यात ओळख निर्माण करणारे नेते या भूमीतील आहे. उच्च पदस्थ अधिकारी कर्मचारी येथे आहेत.याचा इतिहास तपासून पाहण्याचे व आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उठसूठ पैशाच्या जोरावर मतदार विकत घेतो अशी भाषा करणाऱ्या “भावी”नी येथील भूमीचा इतिहास समजून घ्यावा. मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारे आणि सते विरुद्ध दीर्घकाळ विरोधी आमदार निवडून देणारी हीच भूमी आहे. आता मतदारांनी सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. बोलणाऱ्यांनी गर्दीतून य टाळ्या ऐकून खुश होऊ नये स्वतःला मतदार संघात सिद्ध करून दाखवावे लागेल .आपला भाग “राजकीय प्रयोग शाळा” होऊ न देता आपण इतिहास जतन केला पाहिजे .