नांदेड | गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता झालेल्या शांताबाई आदिनाथ आळंदीकर (वय ७७ वर्षे) या वृद्ध महिला रुग्णास अखेर त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करीण्यात डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड येथील रुग्णालय प्रशासनास यश मिळाले असून, आज (दि. २२ ऑगस्ट २०२५) बेपत्ता रुग्णास सुखरूपपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.


बेपत्ता रुग्ण नामे शांताबाई यांना डोक्याला व डोळ्याला मार लागल्याने सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परभणी येथे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात दाखल करण्यात आले. मात्र बोलण्यात अडचण असल्यामुळे त्या स्वतःचे नाव फक्त “शांता” व पत्ता “शंकर नगर” एवढाच सांगू शकत होत्या, त्यामुळे त्यांची ओळख पटविणे कठीण झाले होते.


रुग्णाची खरी ओळख पटविण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कर्मचारी विनेश मातेकर व समाजसेवा अधीक्षक (वैद्य.) राजरत्न केळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना जीवनज्योती आधार फाउंडेशनचे दीपक पवार यांनीही साथ दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णाची माहिती प्रसारित करण्यात आली. ही पोस्ट परभणी परिसरात पोहोचली व त्याआधारे शांताबाई यांचा भाचा सुमित बालू अन्नदाते यांनी ती त्यांचीच आत्या असल्याचे निश्चित केले. तत्काळ दीपक पवार यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून आत्या-भाचा यांची भेट घडवून आणली.


दरम्यान, शांताबाई यांच्यावर शल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनिल देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुनील बोंबले यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. या काळात अधिसेविका अल्का जाधव, परिसेविका मनीषा पाथा, जयश्री गायकवाड यांसह विभागातील निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवेत मोलाचे योगदान दिले.
आज, २२ ऑगस्ट २०२५ रोजी शांताबाई यांचा भाचा त्यांना घरी घेण्यासाठी रुग्णालयात आला. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कौटुंबिक पुनर्वसन मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.

या संपूर्ण उपक्रमामुळे रुग्णालय प्रशासन, स्वयंसेवी संस्था व सोशल मीडियाच्या एकत्रित प्रयत्नांतून हरवलेली वृद्ध महिला अखेर कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र येऊ शकली.


