हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव पोलीस ठाण्याला नुकतेच नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे (Sanket Dighe) यांचा पूर्ण प्रशासकीय कार्यकाळ हदगावमध्येच राहील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार (Abinash Kumar) यांनी दिली. ते गणेशोत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित शांतता समितीच्या बैठकीनंतर ते नांदेड न्यूज लाईव्हशी बोलत होते.


मागील तीन वर्षांत हदगाव पोलीस स्टेशनमध्ये वारंवार बदल्या झाल्याने कोणत्याही निरीक्षकाला कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परिणामी पोलिसांचे गुन्हेगारीवरील नियंत्रण कमी झाले होते. या संदर्भात तालुका प्रतिनिधी शेख चांदपाशा यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एसपींनी दिघे यांच्या कार्यकाळाबाबत आश्वासन दिले.


यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हदगाव तालुक्याचे सामाजिक व राजकीय वातावरण “आदर्श” असल्याचे सांगितले. “विविध राजकीय पक्षांचे नेते परस्पर सहकार्य करतात, त्यामुळे हदगाव तालुका जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही आदर्श म्हणून नावारूपास येईल,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, विविध राजकीय पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.




