महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महायुतीने निर्विवाद यश मिळविले. त्याच धर्तीवर मराठवाड्याने देखील महायुतीला चांगलेच बळ दिले. समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला साथ देत त्यांनाच स्वीकारले. लोकसभा निवडणुकीच्या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मराठवाड्यातील मतदारांनी पूर्णपणे पुसून टाकली. मराठवाड्यात लाडकी बहीण ही योजना यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यात महिलांची मतदानाची टक्केवारी जास्त होती. यामुळे देखील मराठवाड्यातून महायुतीला भरभरून मतदान झाले. मराठवाड्यातून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनाची दखलही बेदखल झाल्यात जमा आहे . कारण मनोज जरांगे फॅक्टर या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे संपल्यात जमा आहे. मराठवाड्यातील ठळक घडामोडीत बीड जिल्ह्यातील परळी येथून धनंजय मुंडे यांचा झालेला विक्रमी विजय पंकजा मुंडे यांच्या पराभवाचा वचपा काढणारा ठरला. तसेच मराठवाड्यातील पूर्वीचे महायुतीचे पाच मंत्री पुन्हा निवडून आले.
नांदेड जिल्ह्यातील भोकरमधून पहिल्यांदाच निवडणूक लढविलेल्या श्रीजया चव्हाण यांचा विजय तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर येथून संजय बनसोडे यांचा विजय, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख यांचा पराभव विशेष उल्लेख करण्यासारखा आहे. औरंगाबाद पूर्व येथून एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरत आहे. छत्रपती संभाजीनगरमधून एम आय एम चे दोन्ही उमेदवार पराभूत झाल्याने मराठवाड्याचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या पक्षाला आता मराठवाड्यातून काढता पाय घ्यावा लागला.
मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात एकूण ८७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी महायुतीला तब्बल ४० जागांवर विजय मिळाला. यंदा पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघात १३९ उमेदवार , नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात १६५ उमेदवार , जालना जिल्ह्यात पाच मतदारसंघात १०९ उमेदवार , परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघात ५८ उमेदवार , धाराशिव जिल्ह्यातील चार मतदारसंघात ६६ उमेदवार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात १८३ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यातील तीन मतदारसंघात ५३ उमेदवार तर लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात १०६ उमेदवार उभे होते. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्र पार पडली . या ठिकाणी काँग्रेसचे पूर्वीचे खा. वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण हे केवळ चौदाशे सत्तावन मतांनी विजयी झाले. मराठवाड्यातील पाच मंत्री व ४४ आमदार यावेळी निवडणुकीला उभे होते . यापैकी महत्त्वाच्या लढतीकडे लक्ष दिले तर छत्रपती संभाजीनगर मधून भाजपचे अतुल सावे यांना एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी आव्हान दिले होते . तसेच बीड जिल्ह्यातील परळी येथील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना शरद पवार राष्ट्रवादी गटाचे राजेसाहेब देशमुख हे चांगली लढत देतील असे मानले जात होते. परंतु महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येणारे उमेदवार हे धनंजय मुंडेच ठरले. तसेच जालना जिल्ह्यात घनसांगवी मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिकमत उडान यांनी निवडणूक लढविली होती. या ठिकाणी माजी मंत्री राजेश टोपे यांना पराभव पत्करावा लागला.
तर लातूर जिल्ह्यातील निवडणूक लक्षवेधक ठरली. या ठिकाणी काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्याविरुद्ध देशाची माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा भाजपच्या अर्चना चाकूरकर यांनी निवडणूक लढविली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे अमित देशमुख हे विजयी झाले. विशेष म्हणजे मराठवाड्यात ते एकमेव आमदार ठरले जे काँग्रेसकडून निवडून आले. याबरोबरच नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खा. अशोक चव्हाण यांची सुकन्या श्रीजया चव्हाण विरुद्ध काँग्रेसचे तिरुपती कोंडेकर यांच्यात लढत झाली. या ठिकाणी श्रीजया चव्हाण यांचा मोठा विजय झाला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादी गटाचे राहुल मोरे यांच्यात लढत झाली . या ठिकाणी तानाजी सावंत हे विजयाचे शिलेदार ठरले.
तसेच धाराशिव जिल्ह्यातीलच तुळजापूर येथील भाजपचे राणा जगजीत सिंग यांनी काँग्रेसचे कुलदीप कदम यांच्याविरुद्ध लक्षवेधक लढत दिली. परभणी जिल्ह्यात पाथरी मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विरुद्ध अपक्ष बाबाजानी दुर्राणी व राजेश विटेकर अशी लढत झाली. मराठवाड्यातील एकूण ४६ मतदारसंघांपैकी छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी ९ मतदार संघात ही निवडणूक पार पडली. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व ,औरंगाबाद पश्चिम तसेच सिल्लोड – सोयगाव , वैजापूर गंगापूर , फुलंब्री , कन्नड – सोयगाव, पैठण , गंगापूर , खुलताबाद या नऊ मतदारसंघात ही निवडणूक पार पडली.
तर नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर , नांदेड दक्षिण , भोकर, किनवट, हदगाव ,लोहा ,नायगाव, देगलूर व मुखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज व परळी या सहा मतदारसंघात ही विधानसभा निवडणूक पार पडली. तसेच लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण , लातूर शहर , अहमदपूर, उदगीर, निलंगा व औसा या सहा विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक पार पडली . जालना जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. त्यामध्ये जालना , परतुर , घनसांगवी, बदनापूर व भोकरदन या मतदारसंघांचा समावेश आहे. तर परभणी जिल्ह्यात चार जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी या मतदारसंघात निवडणूक पार पडली. धाराशिव जिल्ह्यात उमरगा, तुळजापूर ,उस्मानाबाद व परंडा या चार विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक झाली . हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यातील सर्वात कमी म्हणजे तीन मतदारसंघात वसमत, कळमनुरी व हिंगोली येथे विधानसभा निवडणूक पार पडली. मराठवाड्यातील या मतदारसंघातून महायुतीला चांगलेच बळ मिळाले. ४६ पैकी ४० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने मराठवाडा हा महायुतीचा आहे, हे मतदारांनी सिद्ध करून दाखविले.
देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याने भाजपला साथ दिली नाही. त्यामुळे भाजपच्यावतीने मराठवाड्यात यावेळी विशेष लक्ष देण्यात आले. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल भाजपच्या दृष्टीने कसा लागतो, याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होते. मराठा आंदोलनाची धग ज्या मराठवाड्यातून सुरू झाली त्या मराठवाड्याचा कौल कसा असेल ? यावर अनेकदा मतमंथन झाले. परंतु मराठवाड्यातील मतदारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची कसलीही दखल विधानसभा निवडणुकीत घेतली नाही, हे या निमित्ताने अधोरेखित झाले. मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या सभा पार पडल्या. तर काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी , अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सभा पार पडल्या. या सर्व सभांमधून मराठवाड्याने महायुतीच्या नेतृत्वाला स्वीकारले. महायुतीने जाहीरनाम्यात व विविध सभेतून जे आश्वासन दिले ते आश्वासन पार पाडावे व मराठवाड्याच्या प्रश्नांना तत्काळ मार्गी लावावे, अशी अपेक्षा मराठवाडावासीय महायुतीकडून करत आहेत.
…..डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, abhaydandage@gmail.com