श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील सायफळ वाळु घाटातून अवैध रित्या वाळु वाहतुक करणार्या ट्रॅक्टरवर माहूर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली असून तालुक्यातील वाई बाजार येथे दि.२० डिसें.रोजी भल्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्यांनी दिली आहे.
माहूर तालुक्यातील अनेक गावाला पैनगंगा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या पैनगंगा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर वाळूची तस्करी होत असते.आजपर्यत अनेक वाळू तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु वाळूची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि.२० डिसें रोजी वाई बाजार येथे सकाळी ५:३० ते ६ वाजताच्या सुमारास सायफळ येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा विना नंबर असलेला स्वराज कंपणीचा लाल पांढरा ट्रॅक्टर नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्यासह वाई बाजार सज्जाचे तलाठी राम ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल वनवे, कोतवाल विवेक नागपूरे, लक्ष्मण मेश्राम, पवन पाटील, वाहनचालक शेडमाके तसेच वाई च्या पोलीस पाटील ए.बी. मोरे यांच्या पथकाने पकडला आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर महसूल पथकातील कर्मचार्यांनी माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्याकडून प्राप्त झाली आहे.
नागोबा पेंडावरील अवैध वाळू तस्करी थांबेना ! तालुक्यातील वडसा येथील नागोबा पेंडावरुण अवैध वाळु वाहतूक करणार्या वाळूमाफियांचे माहूर महसूल प्रशासनातील काही भ्रष्ठ कर्मचार्या सोबत असलेले संबंध बघता जणू महसूल कर्मचारी देखील वाळूच्या धंद्यात सक्रीय असल्याचा संशय तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
वाळूचोरीमुळे शासनाचा दिवसाकाठी लाखोंचा महसूल बुडीत असून पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे. वाळूमाफियांसाठी महसूल आणि पोलीस विभाग जणू दावणीला बांधल्यासारखे झाले आहे. याबरोबरच वाहतूक पोलीस, वन विभाग, खनिज महामंडळ, गुन्हे शाखा यांच्या देखील कारवाया होतांना दिसून येत नसल्याने अधिकच संशय बळावला आहे. मात्र यावर वरिष्ठ पातळीवर आणि शासनाने दखल घेणे तितकेच गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.