नांदेड| रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक महोत्सव २०२५ बाबत माहिती देण्यासाठी नांदेड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक, वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व याविषयी माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, “शिवराज्याभिषेक हा केवळ धार्मिक वा औपचारिक कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, संस्कृतीचे आणि लोकशक्तीचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व मूल्ये समजावून देणारा आहे.”

शिवराज्याभिषेक महोत्सवाचे ठळक कार्यक्रम: ५ जून २०२५ पासून विविध शैक्षणिक परिसंवाद, इतिहास अभ्यास, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गीते व भजने यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जून सकाळी ७.०० वा. युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनात व श्री शिवराज्याभिषेक समिती यांच्या उपस्थितीत गडावर पारंपरिक ध्वजारोहण व भव्य शोभायात्रा.
त्यानंतर राजदरबारी अभिषेक, सिंहासन पूजन, ऐतिहासिक व्याख्यान, आणि स्वराज्यगीतांच्या गजरात महाअभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ, तानाजी, बाजीप्रभू, हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या गोष्टींवर आधारित सादरीकरण होणार आहे.


या पत्रकार परिषदेस विविध सामाजिक, सांस्कृतिक व स्वराज्य विचारधारेशी जोडलेले मान्यवर उपस्थित होते. यामध्ये –रेणुका मोरे, शिल्पा शेंडगे, सदा पाटील पुयड, गजू पाटील माने, गणेश पाटील काळम, तिरुपती पाटील भगनुरे, अनिल पाटील तेलंग, भास्करराव हंबर्डे, सोपान पाटील नेवल, शिवा पाटील शिंदे, शंकर पाटील पानपटे यांचा समावेश होता.


