हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर तालुक्यात विजांचा कडकडाट होऊन गारपीट झाली असून, अर्धा तास झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांनी शिजवलेल्या हळदीसह, मका, उन्हाळी ज्वारीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने मदतीचा हाथ द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.


नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका परिसरात उन्हाचा तडाखा वाढला असून, प्रशासनाने दिलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याच्या ईशाऱ्याने शेतकरी उन्हाची परवा न करता शेतीत राबत आहेत. अश्यातच मंगळवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन जोरदार गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दैना होऊन शिजविलेले हळद भिजून उत्पन्नाची क्वालिटी खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे.


तसेच कापून ठेवलेला मका भिजून गेला असून, उन्हाळी ज्वारी जमीनदोस्त झाली आहे. या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दुसऱ्या दिवशी बुधवारी रान शिवारात शेतकरी राबत असल्यावरून दिसून आले आहे. एकूणच वादळी वारे गारपिटीमुळे शेतकरी हताश झाला असुन, याची शासनाने दखल घेऊन मदतीचा हातभार लावावा अशी मागणी केली जाते आहे.

शासनाने दखल घेऊन तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी – शेतकरी
हिमायतनगर शहर व तालुका परिसरात मंगळवारी अचानक वादळी वारे, विजांचा कडकडाटाट होऊन गारपीट झाली. गारपीट मुळे शिजवलेल्या आणि रानात काढून ठेवलेल्या हळदीच नुकसान झालं. याचा बरोबर टाळका ज्वारी, मका, पपई, आंबे, टरबूज यासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. यामुळे हळदीची क्वालिटी खराब होऊन भाव कमी मिळून केलेल्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. अशी प्रतिक्रिया साधन शेतकरी संतोष गाजेवार, शंकर इंगळे यांनी देऊन शासनाने दखल घेऊन तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.
