देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील सुंडगी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील खानापूरकर (जिल्हा सरचिटणीस, भाजप नांदेड) होते तर ध्वजारोहण सौ. अनुराधा अनिल पाटील खानापूरकर (माजी जि.प. सदस्या, नांदेड) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तिरुपती शिवाजीराव कनकंटे, संजय पाटील, सौ. संगिता पाटील, एम.एम. पाळेकर व निशिकांत कांबळे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. भीमराव माळगे (वै. धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर) यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा संदर्भ देत सांगितले की, अण्णाभाऊ हे वंचितांचे आवाज होते. त्यांनी शोषितांच्या व्यथा व संघर्षाला साहित्याची उंची दिली. त्यांच्या लेखणीतून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र स्पष्ट दिसतो. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंनी वंचित, पीडितांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावर घटनात्मक उपाय सुचवले. ही दोन्ही दृष्टी समाजासाठी पूरक ठरल्याचे ते म्हणाले.



अध्यक्षीय भाषणात अनिल पाटील खानापूरकर यांनी सांगितले की, “अण्णाभाऊंचे साहित्य सामान्य माणसाला प्रेरणा देणारे आहे. फक्त दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मिळवलेली उंची सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्यांनी पुढे सांगितले की, समाजकार्यासाठी प्रेरणा मला वडिलांच्या संस्कारातून मिळाली तर समाजसेवेचे पाठबळ पत्नी सौ. अनुराधा पाटील खानापूरकर यांचे आहे. जातधर्माचा विचार न करता प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.




