देगलूर, गंगाधर मठवाले| शहापूर परिसरात मुसळधार पावसाने थैमान घालून रौद्ररूप धारण केले आहे. सतत तीन–चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.


शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून केलेली निदणी, कोळपणी व फवारणी पावसामुळे वाया गेली आहे. पिकात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात खरीपाचे पिक हातातून गेल्याने मोठा फटका बसला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढत असून काही ठिकाणी गावात पाणी शिरू लागले आहे. या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


पोकळ आश्वासन नको, कृती करा – जनतेचा लोकप्रतिनिधींना सवाल
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला आणि नेहमीप्रमाणे लोकप्रतिनिधी पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी धावून आले. मात्र, प्रत्यक्ष कृतीऐवजी केवळ पोकळ आश्वासने देऊन निघून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर शहापूर परिसरातील जनतेने तीव्र संताप व्यक्त केला.


“पोकळ आश्वासन नको, पुल बांधून दाखवा,” असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. जवळपास दहा–पंधरा वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटत असूनही एकाही गावात कायम स्वरूपी पुलाचे बांधकाम झाले नाही. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लखा गावच्या पूरस्थितीची पाहणी करताना “सहा महिन्यात पुल बांधून देऊ” असे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत लखा, तुपशेळगाव, लिबा, रामपूर, वनाळी या गावात एकही पुल उभारला गेला नाही.


शासनाकडून वारंवार आयात केलेले पालकमंत्री जिल्ह्यात येतात, पाहणी करतात, आश्वासने देतात पण प्रत्यक्ष काम मात्र होत नाही. त्यामुळे “अशा पोकळ आश्वासनांवर विकास कसा होणार?” असा सवाल जनतेला पडला आहे. ग्रामीण भागातील जनता अजूनही “आज-उद्या विकास होईल, रस्ते व पूल होतील” या भाबड्या आशेवर जगत आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जसच्या तशी असल्याने लोकप्रतिनिधींवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ लागला आहे.


