हिमायतनगर| अतिवृष्टीमुळे कारला शिवारातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. गावातील शिवार पाण्याखाली गेल्याने विशेषतः नाल्यालगतच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांना भेट दिली. पिकांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.



तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगडी सज्जाचे तलाठी थळगे यांनी पिकांचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली, यावेळी त्यांनी माध्यमांना सांगितले की, “अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याप्रसंगी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




