श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| गडावर दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या यात्रे संदर्भात उद्या दि, २८ जूलै रोजी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी गडावर होणार्या प्रमुख यात्रा नियोजन बैठकीस पत्रकारांना आमंत्रित करण्यात येत असते परंतु महसूल विभागाने निर्गमित केलेल्या अधिकृत पत्रात पत्रकारांना बैठकी साठी बोलविण्याचे टाळल्या ने स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.


दतशिखर संस्थान येथिल परीक्रमा नारळी पौर्णिमा यात्रा ही दि ७ ते १० ऑगस्ट दरम्यान साजरी होणार आहे, त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने दि २४ जुलै रोजी यात्रा आढावा नियोजन बैठकीच्या अनुषंगाने पत्र काढले त्यात पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण, एस टी महामंडळ, यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले मात्र यात प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना हेतुपुरस्पर डावलण्यात आले आहे,वास्तविक माहूर शहरातील विविध यात्रेच्या नियोजन व आढावा बैठकीत आज वर पत्रकाराना निमंत्रित केले जात होते.

मात्र “प्रभारी” तहसीलदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या बैठकीत पूर्वी प्रभारीने “प्रताप” केल्याने हे विशेष बाब म्हणून अधोरेखित होत आहे. यामुळे महसूल विभागाची भूमिका संशयास्पद ठरली असून, पत्रकारांना नियोजन बैठकीला न बोलाविण्या मागचे गौडबंगाल काय ? याची चर्चा आता पत्रकार वर्तुळातून होत आहे. यात्रा नियोजनाशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे, जनतेच्या सुविधांसाठी होणाऱ्या उपाययोजना याची माहिती व नियोजनातील आवश्यक बाबी संदर्भात येणाऱ्या सूचना विचारात घेऊन त्यावर उपाययोजना करणे व माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना पत्रकारांना डावलण्याचे नेमके कारण काय या यासंदर्भात पत्रकार संघटनाही एकत्र येत आरसा दाखविण्याचे ठरविले आहे.


दरवर्षी यात्रा नियोजन बैठकीचे निमंत्रण असते यात्रेच्या नियोजनात पत्रकार हा पारदर्शकता ठेवण्याचे काम करतो. परंतु नारळी पौर्णिमा यात्रेच्या बैठकीस आमंत्रण न देणे म्हणजे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सरफराज दोसानी व द पावर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष विजय आमले यांनी दिली आहे. श्रीक्षेत्र माहूर येथे संपन्न होणाऱ्या मोठ्या यात्रेच्या नियोजन बैठकीचा पत्रकार हा अविभाज्य घटक असतो.बैठकीत पत्रकार हे यात्रा नियोजना संदर्भातील उणीवावर बोट ठेवतात, ते न रुचल्यानेच कदाचित पत्रकारांना यावेळी बैठकीपासून दूर ठेवले असेल अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे यांनी दिली आहे.


