हदगाव, शेख चांदपाशा| उत्कृष्ट लिखाण, शोध पत्रकारिता त्याचबरोबर वंचित व उपेक्षितांना न्याय देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या वृत्तपत्रातून मांडत त्या समस्यांचे निराकरण करणे,त्यांना न्याय मिळवून देणे, न्याय मिळेपर्यंत लिखाण करून अन्यायाविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा देणे, उपेक्षितांना न्याय मिळवून देणे,शेतकरी, कष्टकरी यांच्या बातम्यांना न्याय देऊन त्या बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचे काम पत्रकार करत असतो.


या सर्व बाबी ग्रामीण भागातील बातमीदार गजानन पाटील यांच्या लेखणीतून स्पष्टपणे उमटल्या, त्या आधारावर पनवेल प्रेस क्लब व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘एक्सलेंस पत्रकार अवॉर्ड’ हदगाव (जिल्हा नांदेड) येथील पत्रकार गजानन पाटील यांना वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व प्रसिद्ध अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद या उपस्थित होत्या. त्यांच्याच शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला.

ग्रामीण भागातून पत्रकारिता करत असताना सर्वांना न्याय मिळवून देण्याचे काम, वंचित, उपेक्षितांना त्यांचा हक्क मिळवून देत दिव्यांगांचे प्रश्न, ‘बातमी मागील बातमी’ एखाद्या विषयाचा केलेला सतत पणे पाठपुरावा आणि त्या माध्यमातून करून दाखविलेला परिणाम या सर्व लिखाणाच्या अनुषंगाने हा एक्सलेंस अवार्ड ग्रामीण पत्रकार तथा पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष गजानन पाटील यांना वितरित करण्यात आला.

नवीन मुंबई पनवेल प्रेस क्लब व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात “महासागर एक्सलन्स अवॉर्ड २०२५” चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून सर्व स्तरातील नामांकन आले होते आणि त्यामधूनच मोजक्या प्रतिष्ठित आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जसे की, उद्योग, मेडिकल क्षेत्रातील नामांकीत डॉक्टर, शेतकरी, उत्कृष्ट पत्रकारिता करणारा पत्रकार,सामाजिक कार्यात अग्रगण्यपणे काम करून निस्वार्थपणे कार्य करत असलेल्या व इतर सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

या सन्मान सोहळ्यासाठी चित्रपट अभिनेत्री दिपाली सय्यद, माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर, दैनिक महासागर चे मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेंडगे, बेटी बचाव चे प्रमुख डॉ.गणेश राख, पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक एडवोकेट प्रथमेश सोमन, दैनिक महासागर चे नाशिकचे संपादक प्राध्यापक जयंत महाजन, जे. जे. ऑफ आर्ट नागपूरचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स्वप्नील दुधारे,पत्रकार आशुतोष,संजय सुर्यवंशी, व प्रविण दुधारे,राहुल बहादुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले तर पत्रकार प्रशांत शेडगे यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र भरातून सर्वच स्तरातील व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यासाठी पनवेल प्रेस क्लब आणि महासागर च्या टीमने उत्कृष्ट कामगिरी बजावत हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात क्रांतिवीर बळवंत फडके सभागृहात संपन्न केला. गजानन पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते आत्माराम पाटील वाटेगावकर,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या.