नांदेड| उमरी तालुक्यातील गोदावरी काठावरील कौडगाव या सुमारे 632 लोकसंख्येच्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली 81.52 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली असून, सदर योजनेचे संचालनाची जबाबदारी आता ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आली आहे.


या योजनेअंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेल्या उद्भभव विहिरीचे खोलीकरण करून, त्यावर नवीन पंप हाऊस उभारण्यात आले. विहिरीपासून मुख्य टाकीपर्यंत अंदाजे अडीच किमी अंतरापर्यंत 5 इंची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तसेच गावामध्ये 48 हजार लिटर्स क्षमतेची पाण्याची साठवण टाकी उभारण्यात आली आहे. वितरण व्यवस्थेसाठी सुमारे 2.5 ते 3 किमी लांबीची पाईपलाईन टाकण्यात आली असून, गावातील एकूण 143 घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र शासनाचा हर घर जल हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यात आला असून, या योजनेमुळे कौडगावाचा दीर्घकाळ चालू असलेला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. ही योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली आहे. सद्यस्थितीत योजना यशस्वीरित्या ग्रामपंचायतीमार्फत चालवण्यात येत आहे.

या योजनेच्या कार्यान्वयनासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक केले असून, योजनेचा सातत्याने व नियमितपणे लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपट्टीची वसुली नियमित करून योजना स्वयंपूर्ण ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
