किनवट, परमेश्वर पेशवे| विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यामुळे दलित शोषित पीडित समाजात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.सोमनाथ सूर्यवंशी,संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या हे अलीकडच्या काळातील ज्वलंत उदाहरणे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व्यवस्था टिकवायची असेल तर भारतीय संविधान वाचविण्यासाठी बहुजनानी एकत्रित लढा देणे काळाची गरज बनली आहे असे मौलिक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांनी किनवट येथे केले आहे.


किनवट येथील समता नगर येथे 9 जानेवारी रोजी आयोजित 14 व्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेतील समारोपीय सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून सक्षणाताई सलगर बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार विजयराव खडसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय सोळंके किनवटचे माजी नगराध्यक्ष साजिद खान प्राध्यापक राम भरणे राज बनकर विकास कुडमेथे बालाजी बामणे निमंत्रक निखिल वाघमारे यांची प्रामुख्याने पस्थिती होती.

पुढे बोलताना सलगर म्हणाल्या की विषमतावादी व्यवस्थेचे लोक सत्तेत गेल्यापासून दलित शोषित पडितावर अन्यायाचे सत्र सुरू झाले. सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्या इथल्या विषमतावादी व्यवस्थेने घडून आणल्या या देशात सामाजिक एकोपा स्वातंत्र्य बंधुता व न्याय टिकून ठेवायचा असेल तर भारतीय संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी बहुजनांनी एकत्रितपणे लढा उभारणे काळाची गरज बनली आहे.

धम्म परिषदा सामाजिक चळवळीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे स्पष्ट करत गेल्या 14 वर्षापासून किनवट सारख्या मागास दुर्गम भागात भव्य दिव्य अशा धम्म परिषदांच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक राहुल कापसे व त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले, महाराष्ट्रला शाहू फुले आंबेडकर अहिल्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे येथे जातीपातीला मुळीच थारा नाही. धम्म परिषदेतुन तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रखर विचारांचं प्रतिबिंब दिसतं असेही सक्षनाताई सलगर म्हणाल्या. या धम्म परिषदेला मराठवाडा विदर्भ व तेलंगणा राज्यातून हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
