नांदेड| जुन्या नांदेड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेल्या नावघाट पुलावरील सुरक्षेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. पुलावर अपघातांचा धोका कायम असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने सेफ्टी अँगल बसविण्याचे काम हाती घेतले आहे.


गणेशोत्सव विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. ६ सप्टेंबर रोजी आनंद चतुर्दशी निमित्त हजारो भाविक आपल्या परिवारासह विसर्जन मिरवणुकीसाठी पुलावरून जाणार आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने ही कामे तातडीने होणे आवश्यक होते.


शिवसेनेचे उपजिल्हा संघटक व प्रभाग क्र.१४ निरीक्षक गजानन साहेबराव हारकरे पाटील व कार्यकर्ते गणेश पेन्सिलवर यांनी पुलावर सेफ्टी अँगल बसविण्याची ठाम मागणी प्रशासनाकडे केली होती. ५ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन त्वरित हलले.



हारकरे पाटील म्हणाले, “जनतेची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च आहे. वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाने वेळकाढूपणा केला. मात्र आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर दखल घेण्यात आली. यामुळे विसर्जन मिरवणुकीत जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.”



