हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. माळोदे यांनी हिमायतनगर तालुक्यातील टेंभी ग्रामपंचायतीला भेट देऊन सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.


यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर माहिती त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. गावातील अंतर्गत रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन, शोषखड्ड्यांची उभारणी, पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था यासह इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.

विशेषतः गावामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व्यवस्थेचे श्री. माळोदे यांनी तोंडभरून कौतुक केले. ग्रामपंचायतीने केलेले नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज हे इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.


या पाहणी दरम्यान आतरिक्त मुख्यकार्यकारी श्री माळोदे, गटविकास अधिकारी श्री नरवाटकर, विस्तार अधिकारी श्री टारपे, विस्तार अधिकारी श्री शिंदे, अभियंता श्री पवार, सरपंच सौ. वंदना कानबा पोपलवार, उपसरपंच सोनूताई आनंद नागोराव मुतनेपाड, तंटामुक्ती अध्यक्ष गणपतराव पूजलवाड व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानामुळे गावाचा सर्वांगीण विकास होत असून नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.


