नांदेड| संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा माध्यमातून लाभार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) पोर्टलवर लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत केली जात आहे. यासाठी आधार प्रमाणिकरण अत्यावश्यक असून दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत प्रत्येक तालुक्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना विभागाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
तसेच सप्टेंबर 2023 पासून प्रलंबित असलेले कुटूंब अर्थसहाय्य योजनेचे अनुदान ज्यामध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यास 20 हजार एकरकमी वारसांना देण्यात येतात. अशा 400 लाभार्थ्याचे एकूण 80 लक्ष रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील केंद्र शासनाचे अनुदान देखील जिल्ह्याला प्राप्त झाल्याची माहिती संजय गांधी योजना विभागाच्या तहसिलदार प्रगती चोंडेकर यांनी दिली आहे.
6 जानेवारी रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
ग्राहकांचे हक्क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनजागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे दुपारी 1 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष राहुल प्र. पाटील हे राहतील.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी पी.एस. बोरगावकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर पवार, ॲड. शलाका प. ढमढेरे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे छ. संभाजीनगरचे संघटक बालाजी लांडगे, ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, संघटक ॲङ आनंद कृष्णापूरकर, उपाध्यक्ष डॉ. सायन्ना मठमवार यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या या कार्यक्रमास सर्व नागरिक, ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले व तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी केले.