मुंबई| देशाचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आणि संसदपटू होते. डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
अर्थमंत्री या नात्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि जागतिकीकरण व उदारीकरणाच्या मार्गावर नेले. डॉ. मनमोहन सिंग विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जात. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून त्यांनी संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे भारताने जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू व विद्वान व्यक्तिमत्व गमावले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारताचे माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, प्रधानमंत्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.
माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री अजित पवार
भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी प्रधानमंत्री, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहन सिंग यांनी रचला. मागील अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचे बहुतांश श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचे मोठे श्रेय डॉ. मनमोहन सिंग यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचे सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्व हरपले आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी प्रधानमंत्री आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.