नांदेड| शहरातील आनंदनगर भागातील राज मॉल येथे दि.22 च्या सायंकाळी साईनाथ कुळेकर या 17 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी एका कापड दुकाना बाहेर त्याच्यासोबत वाद घातला आणि तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार करून खून केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, गुरूवारी रात्री उशिरा पाच जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल (case has been registered against five persons) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपी अल्पवयीन शालेय विद्यार्थी असून, यात आठवी, नववी आणि दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, या घटनेत साईनाथ कुळेकर हा गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साईनाथ याच्या खूनप्रकरणी त्याचे वडील प्रकाश कुळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साईनाथ प्रकाश कुळेकर हा मूळचा बाळापूर (जि. हिंगोली) येथील रहिवाशी असून, त्याचे वडील प्रकाश कुळेकर हे कंत्राटदार आहेत. साईनाथ हा शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी असून, तो आणि त्याचा लहान भाऊ शिक्षणासाठी नांदेड येथे राहतात. आनंदनगर परिसरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या साईनाथच्या लहान भावाला त्याच्याच वर्गातील काही मुलांनी मारहाण केली म्हणून साईनाथने चार दिवसांपूर्वी एकास मारहाण केली होती. तेव्हापासून साईनाथ आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होता. हा वाद टोकाला जाऊन बुधवारी त्यांच्यात हाणामारी झाली. त्यातच साईनाथचा चाकू लागून मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत साईनाथचे वडील प्रकाश संभाजीराव कुळेकर यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, या खुनातील सर्व आरोपी अल्पवयीन शालेय विद्यार्थी असून, आठवी, नववी आणि दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आरोपींपैकी दोघे जण प्रतिष्ठित घरातील असल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये एकजण राजकीय पुढाऱ्याचा तर दुसरा वकिलाचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी मॉल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींच्या शोधासाठी विमानतळ पोलिस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक अशी दोन पथके स्थापन केली आहेत. या घटनेचा पुढील तपास विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे करीत आहेत.
