हिमायतनगर (अनिल मादसवार) बुधवार, दिनांक 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात भक्तीमय व सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. या निमित्ताने शहर व परिसरातील महिला मंडळींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले.



सकाळपासूनच मंदिर परिसरात श्रद्धाळूंची गर्दी दिसून आली. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून सुख-समृद्धी, आरोग्य आणि समाजातील शांतता अबाधित राहावी यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर महिलांनी एकमेकींना तिळगुळाचे वाटप करत “तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…” असा संदेश देत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.


या उपक्रमातून केवळ धार्मिक श्रद्धाच नव्हे तर सामाजिक एकोपा, आपुलकी आणि सौहार्द जपण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. कटुता दूर करून गोडवा वाढवावा, मतभेद विसरून नातेसंबंध दृढ करावेत, हा मकरसंक्रांतीचा खरा आशय असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हिमायतनगरात धार्मिक परंपरा आणि सामाजिक मूल्यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, एकता आणि सांस्कृतिक जाणीव अधिक बळकट होत असल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले.



“कुंकवाचा व मडक्याचा आवा लुटण्याची परंपरा म्हणजे नारीशक्तीचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ही सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.” अशी माहिती “ढोल-ताशांच्या तालावर मिरवणूकित सामील झालेल्या महिलांनी सांगितली. मकरसंक्रांती साजरी करताना महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह खऱ्या अर्थाने सणाचे सौंदर्य वाढवतो.” अशा सणांमुळे महिलांमधील आपुलकी, आनंद आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो.”


