नवीन नांदेड| सिडको परिसरात एका कुटूंबातील सदस्याने काजांळा तांडा येथील शेतातून सोयाबीनच्या शेंगा आणल्या. त्या शेंगा खाल्ल्याने परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेत एका १४ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.


सिडको परिसरातील जय भवानीनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या नामदेव ही खानजोडे हे आजू- बाजूला भावासह राहतात. तीन दिवसांपूर्वी कांजाळा तांडा येथे मिस्त्री कामासाठी गेले असता कामाचा बाजुला असलेल्या शेतातील सोयाबीन शेंगा घरी घेऊन आल्यानंतर सायंकाळी उकळून घेतल्यानंतर त्या बबन यांनी नाम देव यांच्या घरी पण दिल्या. नंतर त्या खाल्ल्याने थोड्यावेळाने शोभा नामदेव खानजोडे वय ५० वर्ष, स्नेहल शिवाजी तलवारे वय १३ वर्ष, बबन शंकरराव खानजोडे वय ५७, अनिल बबन खानझोडे वय ३५ वर्ष, जानू अनिल खानजोडे वय २७ वर्ष, नामदेव ऊकंडजी खानजोडे व सोनाली नामदेव खानजोडे वय १८ यांना उलट्या सुरू झाल्या. यामुळे परिसरातील खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने गोळया देण्यात आल्या.


मात्र काही वेळाने पुन्हा त्रास व उलट्या होत असल्याने दोन जणांना नांदेड शहरातील खाजगी दवाखान्यात तर उर्वरित सहा जणांना शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. रात्री उशिरा दोघांना नांदेड शहरातील खाजगी तर इतरांना शासकीय रुग्णालय विष्णुपूरी येथे दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या इंदिरा गांधीं हायस्कूल हडको येथील आठवी वर्गात शिकणाऱ्या मिरा नाम देव खानजोडे वय १४ वर्ष हिचा मृत्यू झाला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. तर नामदेव खानजोडे यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथील आठवी वर्गात शिकणाऱ्या मिरा नामदेव खानजोडे वय १४ वर्ष हिचा उपचार दरम्यान दि. ५ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वाजता निधन झाले. ६ ऑक्टोबरला मिरा हिच्यावर सिडको येथील स्मशानभुमीत सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास सुरू आहे.
