हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुका परिसरात परतीच्या पावसाने प्रचंड विजांच्या कडकडाटात बुधवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली आहे. तब्बल दीड तासाहून अधिक वेळ चाललेल्या पावसामुळे शहरातील रस्ते पुराच्या पाण्याने भरून वाहत होते. विजांचा कडकडाट एवढा होता की शहर हादरू लागले असल्याचा भास नागरिकांना झाल्याने अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एकूणच पावसाने जाणवू लागलेल्या उकडयांपासून दिलासा मिळाला असला तरी शेतीत काढणीला आलेले सोयाबीनमध्ये पाणीच पाणी जमा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या दुसऱ्या मुसळधार पावसामुळे हाताशी आलेले सोयाबीन गेल्यात जमा झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना पहिल्यांदा आणि आता दुसऱ्यांदा झालेल्या नुकसानीचा मोबदला म्हणून हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहर व परिसरात यंदाचा खरीप हंगाम पूर्णतः गेल्यात जमा आहे. पोळ्याच्या पूर्वी म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी, नाल्याच्या शहर व तालुका परिसरातील सर्वच शेतकरी नुकसानीत आले. अनेकांच्या जमिनी पिकासह खरडून गेल्या नदीकाठावरील शेतकऱ्यांची पिके तर गेली आगामी ५ वर्षाच्या काळात त्या जमिनीत काहीच पकणार नाही अशी बिकट अवस्था झाली आहे. त्यानंतर पार्टीच्या पावसाचा अंदाज हवामान खाते विभागाने वर्तविला. नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जरी केल्याप्रमाणे हिमायतनगर शहर व तालुक्यात परतीच्या पावसाने बुधवारी सायंकाळी पाच ते सात वाजेच्या दरम्यान जोरदार हजेरी लावली.

पाऊस प्रचंड विजांच्या कडकडाट आणि वडाळी वाऱ्याने अतिवृष्टी सारखा पाऊस झाला.या पावसामुळे आगामी काळात होणाऱ्या पाणीटंचाईच्या चिंतेला थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे हिमायतनगर शहर तालुका परिसरातील रान शिवारात पाणीच पाणी झाल्यामुळे पिके उन्मळून गेली होती. उर्वरित पिके कशीतरी तग धरत असताना आता पुन्हा एकदा या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहर व तालुक्याला झोडपून काढले आहे. त्यामुळे हाताशी आलेले सोयाबीन आणि कापसाचे पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने दुसऱ्यांदा हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीला लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

कारण ऐन मोसमात आलेल्या सोयाबीनला आणि कापसाला अगोदरच्या अतिवृष्टीने प्रचंड फटका बसला. त्यानंतर उर्वरित सोयाबीनला फळधार झाली नाही. त्यात येलो मोझॅइक आणि करपा रोगाने सोयाबीनला पोखरल्याने उत्पादनात घाट निर्माण झाली आहे. आता काढणीला आलेल्या सोयाबीनच्या मोसमात पार्टीच्या पावसाने उर्वरित पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतात शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये केलेल्या पीक लागवडीचा खर्च देखील निघण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पुरते संकटात टाकले आहे. नदी नाल्याच्या काठावरील शेतकरी तर अक्षरशः उध्वस्त झाले असून, 80% हून अधिक शेतकरी यावर्षीच्या खरीप हंगामात बरबाद झाले… असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
