हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित श्री दुर्गामाता दौडचा आज विजयादशमीला थाटात समारोप करण्यात आला. घटस्थापनेपासून सुरू झालेली ही दौड सकाळी ५ वाजता कालिंका मंदिरापासून निघाली व शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शोभायात्रा काढून परत मंदिराजवळ आली.



दौडीदरम्यान ठिकठिकाणच्या चौकात महिला मंडळींनी भगव्या ध्वजाची आरती पूजन करून पुष्पवृष्टीतून दौडीच स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण शहरात हिंदू संस्कृतीचे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या दौडीचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी उभारलेले हिंदवी स्वराज्य जनतेच्या मनात जागवणे तसेच देव–देश–धर्माची प्रेरणा युवकांमध्ये निर्माण करणे हा होता.



समारोप शोभायात्रा दौडीत चिमुकल्यांच्या माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती समभाजी महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला होता. तर सर्व शिवभक्त युवकांनी पांढरा कुर्ता-पायजमा, पांढरी टोपी व पदक घालून सहभागी झाले. शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे शिवसंस्कार आणि राष्ट्रभावनेचा उत्साह नव्याने जागृत झाल्याचे युवकांनी व्यक्त केले.





