नांदेड। जिल्ह्यात एक सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले मूग, उडीद आणि बहरात असलेले सोयाबीन, कापुस, भाजीपाला-फळबागाचे तसेच जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.


निवेदनात अशी म्हटले आहे की,अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही ठिकाणी तर पिके पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. जमिनी खरडून गेली आहेत. पिक विमा तात्काळ लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करावा. नांदेड जिल्ह्यातील दरवर्षी धरणे भरल्यामुळे परिसरातील शेतजमीन पूर्णता पाण्याखाली येते, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी.

प्रमुख मागण्या- १) सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी ५०,००० रुपयाची मदत जाहीर करावी. २) भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ७५,००० रुपयाची मदत जाहीर करावी. ३) फळबाग उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी दीड लाख रुपयाची मदत जाहीर करावी. ४) खरीप हंगाम २०२४ पीक विमा १००% तात्काळ लागू करावा. ५) येलो मोझॅक तक्रार ग्राह्य धरून खरिप हंगाम २०२३ चा पिक विमा लागू करावा. ६) धरणाच्या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी. यावेळी रयत क्रांती पक्षाचे उत्तम वडजे, आरटीआय कार्यकर्ते विलास शिंदे, रामेश्वर वजीरगावे,शिवराज पवळे, इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
